पत्राचाळ घोटाळा आरोपांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आरोप खोटे निघाले तर…”

मुंबई | Sharad Pawar – पत्राचाळ घोटाळा प्रकरणात भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव घेतलं आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसंच आता या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यासाठी आज (21 सप्टेंबर) शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. ईडीचे आरोपपत्र व 2006 साली मी घेतलेल्या बैठकीचे आरोप खोटे आहेत. तरीही चौकशी करावी. चौकशीतून आरोप खोटे निघाले तर, आरोप करणाऱ्यावर काय कारवाई करणार, हे राज्य सरकारने (State Government) जाहीर करावं, असं आव्हान शरद पवार यांनी केलं आहे.
“पत्राचाळ प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. चौकशी करणाऱ्या संस्थेनं कोर्टात काय सांगितलं? तसंच तेव्हा राज्य सरकारमध्ये काय चर्चा झाली याची प्रत माझ्याकडे आहे. चौकशीला नाही म्हणण्याची आमची भूमिका नाही. चौकशी झाल्यानंतर हा आरोप वास्तव आणि सत्याला धरून नसेल, तर काय भूमिका घेणार? हे राज्य सरकारनं जाहीर करावं”, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Case) प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. तसंच ईडीने आरोप पत्र दाखल केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे. अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे.