फ्रेंच कट दाढी अ्न किलर स्माईल, शरद पवारांच्या ‘त्या’ फोटोची होतेय चर्चा

मुंबई | Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजकीय कारकिर्दीची चर्चा राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनतेमध्ये नेहमीच दिसून येते. वेगवेगळ्या पक्षीयांच्या शरद पवारांविषयी वेगवेगळ्या भूमिका राहिल्या आहेत. तसंच शरद पवारांची राजकीय कारकिर्द उल्लेखनीय आहे. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. अशातच आता चर्चा होतेय ती शरद पवारांच्या एका फोटोची.
सध्या शरद पवार यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक फोटो शेअर केला आहे. सुप्रिया सुळेंनी बुधवारी (22 मार्च) त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शरद पवारांचा एक तरूणपणीचा फोटो शेअर केला आहे. सध्या या फोटोची सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.
सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट असून तो किमान 40 ते 50 वर्षांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. हा फोटो पोस्ट करत सुप्रिया सुळेंनी “नॉस्टॅल्जिया” असं कॅप्शन दिल आहे. या फोटोत शरद पवारांची फ्रेंच कट दाढी असल्यामुळे सध्या तो फोटो विशेष चर्चेचा ठरला आहे. आत्तापर्यंत लोकांनी शरद पवारांना त्यांच्या सध्याच्या लुकमध्ये पाहिलंच आहे. पण आता काळीभोर फ्रेंच कट दाढी राखलेल्या शरद पवारांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. या फोटोला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली असून अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.