राज ठाकरेंच्या मुलीचा ‘डिपफेक’; शर्मिला ठाकरेंनी सांगितला ‘तो’ संपूर्ण भयानक अनुभव
मुंबई : (Sharmila Thackeray On Deepfake Videos) बॉलिवूड अभिनेत्रींचे काही दिवसांपूर्वी काही डीपफेक फोटो (Deep Fake Photo) आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. यानंतर डीपफेक तंत्रज्ञानाबद्दल सर्वच स्तरातून भीती व्यक्त करण्यात येत होती. पुढे पंतप्रधान मोदींनी (PM Modi) देखील या व्हिडीओंचा उल्लेख केला होता. यानंतर आता डीपफेक फोटोवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. डीपफेक फोटो आणि व्हिडीओ प्रकरणी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी शर्मिला ठाकरे यांनी केली आहे.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या, तुम्हाला विश्वास बसणार नाही या फेक व्हिडीओचा अनुभव मला आहे. माझ्या मुलीला पण युट्युबवर वाटेल तसे मेसेज टाकतात. अनेक वेळा या संदर्भात मी स्वत: कमिशनरांना तक्रार केली आहे. तक्रारीनंतर मुलांना अटकही केली जाते. मात्र आपला कायदा तकलादू असून जो ब्रिटिशकालीन आहे. त्यामुळे अटक केल्यानंतर त्यांना सोडण्यात येते, कायद्यात कुठेतरी बदल केला पाहिजे तेव्हाच त्यावर उपाय निघेल.
अनेक अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर
अभिनेत्री रश्मिका मंदाना, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विविध प्लॅटफॉर्मवर हे व्हिडीओ शेअर करण्यात आले. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर या अभिनेत्रींना पाठिंबा देऊन या प्रकरणावर संताप व्यक्त केला. अमिताभ बच्चन यांनी रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडीओ क्रिएट करणाऱ्यावर कायदेशीर करवाई करण्याची मागणी केली होती. तसेच चिन्मयी श्रीपाद, नागा चैतन्य आणि मृणाल ठाकूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणाबाबत संताप व्यक्त केला होता.