शीना बोरा जिवंत, इंद्राणी मुखर्जी यांच्या वकिलांच्या दाव्यानं प्रकरणाला वेगळं वळण
मुंबई | Sheena Bora Case – शीना बोरा हत्याकांडातील (Sheena Bora Case) एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. शीना बोरा ही आजही जिवंत आहे. शीना बोरा 24 एप्रिल 2012 नंतरही राहुल मुखर्जीच्या संपर्कात असल्याचा दावा शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजीत सांगळे यांनी केला आहे. आज (3 नोव्हेंबर) या प्रकरणाची सुनावणी पार पडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.
“शीना बोरा आजही जिवंत आहे, असा आमचा दावा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर 2012 पर्यंत ते दोघे संपर्कात असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. शीना बोराला भेटणारा शेवटचा व्यक्ती हा राहुल मुखर्जी होता. त्यामुळे ती कुठं आहे, हे राहुल मुखर्जी सांगू शकतो. मात्र, ती जिंवत असल्याचा आमचा दावा”, असं रणजीत सांगळे यांनी सांगितलं आहे.
“शीना तथाकथीत गायब झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 25 आणि 26 एप्रिल 2012 रोजी श्यामवर रॉय आणि राहुल मुखर्जी यांचं दोनवेळा मोबाईवर संभाषण झालं होतं. 2 मे रोजी सुद्धा त्यांनी संपर्क केला होता. मात्र, याबाबत पोलिसांसमोर किंवा सीबीआयसमोर किंवा कलम 164 अंतर्गत न्यायालयात दिलेल्या जबाबात त्याने असा कोणताही उल्लेख केला नाही. त्याला त्याबाबत विचारलं असता, असं संभाषण झाल्याचं आठवत नसल्याचं त्यानं सांगितलं आहे”, असंही ते म्हणाले.
पुढे रणजीत सांगळेंनी सांगितलं की, “शीनाबरोबर लग्न झाल्याचं खोटं विवाह प्रमाणपत्रही राहुलनं बनवल्याचं उलटतपासणीत कोर्टात उघड झालं आहे. याबाबत अनेक पुरावे समोर येत आहेत. मात्र, राहुल उत्तरं द्यायला टाळाटाळ करतो आहे. ‘मला माहित नाही, मला आठवत नाही”, असं उत्तरं तो देत असल्याची माहितीही त्यांनी दिली.