मविआच्या महामोर्चाला शिंदे-फडणवीस सरकरानं परवानगी नाकारली? अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई | Ajit Pawar – सध्या राज्यात महापुरुषांच्या अपमानावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीकडून महामोर्चाचं (Mahamorcha) आयोजन करण्यात येत आहे. यासाठी मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना शिंदे-फडणवीस सरकारनं (Shinde-Fadnavis Government) महामोर्चाला परवानगी नाकारल्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
अजित पवार म्हणाले की, “अतिशय शांततेच्या मार्गानं हा मोर्चा होईल. लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने आपलं मतप्रदर्शन करण्यासाठी मोर्चा काढला जातो तसाच मोर्चा आम्ही काढणार आहोत. यासाठी आम्ही राज्य सरकारकडे ज्या सर्व परवानग्या मागायच्या असतात त्या मागितल्या आहेत. अद्याप आमच्या हातात परवानगी आलेली नाही, परंतु नक्की येईल. आम्हाला परवानगी मिळेल असा विश्वास आहे.”
“आम्हाला कोणतीही परवानगी नाकारली गेलेली नाही. अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. आमचा मोर्चा निघणार आहे. त्यानुसार मुंबईत एमएमआरडीएच्या भागातून आणि ठाणे, पालघर, नाशिक, पुणे अशा सर्व महाराष्ट्रातून उत्सफुर्तपणे लोक सहभागी होतील,” असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.



