बीड : मराठा समाजासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत लढा देणारे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे रविवार दि. १४ ऑगस्ट रोजी कार अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाल्याने बीड जिल्ह्यावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मागील दोन वर्षानंतर कोरोनाच्या सावटातून बाहेर पडल्यावर बीड जिल्ह्यात यंदा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. ‘दीप ज्योत ग्रुप’च्या वतीने हरियाणामधील प्रसिद्ध गायिका सपना चौधरीच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सुरुवातीला दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून सर्वांनी मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मात्र, नंतर याच कार्यक्रमात‘तेरे आखो का ये काजल’ या प्रसिद्ध गाण्यावर सपनाने ठुमके लगावल्याने, बीडकरांनी या गाण्याला दादा दिल्याचं पहायला मिळालं. एकीकडे तरुणांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केले तर दुसरीकडे या कार्यक्रमाच्या आयोजनावरुन अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. विनायक मेटे यांच्या निधनाने जिल्ह्यात शोककळा पसरली असताना, अतिवृष्टीने शेतकरी संकटात आहेत. अशा वेळी मोठ्या प्रमाणावर खर्च करुन कार्यक्रम अगदीच जल्लोषात साजरा केला जात आहे. परळी शहरात शिंदे गट-भाजपच्या संयुक्त विद्यामानाने हा कार्यक्रम साजरी केला होता. त्यामुळे जिल्ह्यात शिंदे-फडणवीस सरकारचे चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.