ताज्या बातम्यारणधुमाळी

शिंदे गटाचे संजय शिरसाट मातोश्रीच्या वाटेवर?, शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट

जळगाव | Sushama Andhare – एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसोबत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत चांगलीच फूट पडली. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यादरम्यान, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिंदे गटात (Shinde Group) काही आमदार नाराज असून काहीजण आमच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक खुलासा सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्या सध्या ‘महाप्रबोधन यात्रे’निमित्त जळगावात आहेत. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि आम्ही संयमित भाषेचा वापर करत आहोत. आम्ही टीका करताना कधीही पातळी सोडणार नाही. बंडखोरांना माघारी परतता येईल असे संकेत देताना त्यांनी परतीचे दोर आमच्याकडून कापले गेले नसल्याचं म्हटलं आहे. तसंच आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे शिंदे गटात अस्वस्थ असून त्यांना पश्चाताप होत आहे. ते आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट अंधारेंनी केला आहे.

पुढे सुषमा अंधारेंनी भाजपवर टीका केली. ईडी, सीबीआयचा भाजपकडून दुरूपयोग सुरू आहे. भाजपमध्ये असलेल्या कोणत्याही भ्रष्टाचारी नेत्याविरोधात कारवाई केली जात नाही. कोरोना काळात जिल्ह्यात झालेल्या अपहाराबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही. किरीट सोमय्यांची ईडीशी जवळीक आहे. त्यांनी पाचोरा येथील जमीन आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावं अशी मागणी केली. महापौर शिवसेनेच्या आहेत म्हणून महापालिकेचा निधी पालकमंत्री रोखत आहेत, त्यांना त्रास दिला जात आहे हे योग्य आहे का? असा सवाल अंधारेंनी केला आहे. तसंच मागील काही दिवसात कुरघोडीचे राजकारण सुरू असून लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घोषणा झाल्या आहेत. मात्र या घोषणा हवेतच असल्याचं त्यांनी सांगितलं

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये