शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर वादाच्या भोवऱ्यात! शेजाऱ्यांला केली मारहाण, ठाकरे गटाची वादात उडी
कोल्हापूर : (Shinde Group vs Thackeray Group) राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी मारहाण केल्याचा आरोप शेजारी राहणाऱ्या राजेंद्र वरपे कुटुंबाने केला आहे. वरपे आणि क्षीरसागर असा वाद मागील अनेक वर्षापासून सुरु आहे. शनिवारी रात्री या वादाचे पर्यवसन हाणामारीत झालं. मारहाण झालेल्या वरपे कुटुंबीयांनी पोलिस गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला आहे.
कोल्हापुरातील शनिवार पेठ परिसरात एका अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावर राजेश क्षीरसागर यांचा फ्लॅट आहे. त्याच्या फ्लॅटसमोरच राजेंद्र वरपे यांचाही फ्लॅट आहे. पाचव्या मजल्याच्या टेरेसवर राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वारंवार रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरू असतात असा आरोप करण्यात आहे आहे. त्यांच्या याच त्रासाला कंटाळून हा वाद घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
टेरेसवर पार्टी सुरू असताना रात्री उशिरापर्यंत पार्टी करू नका, असं राजेंद्र वरपे हे सांगण्यास गेले असता क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. राजेंद्र वरपे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार केली आहे. मात्र पोलिसांनी क्षीरसागर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. क्षीरसागर यांनी राजेंद्र वरपे यांना गोळी घालणार अशी धमकी दिल्याचा आरोप वरपे यांनी केला आहे.
राजेंद्र वरपे ज्या फ्लॅटमध्ये सध्या राहत आहेत, तो फ्लॅट राजेश क्षीरसागर यांना हवा आहे. त्यामुळे वरपे कुटुंबीयांनी तो फ्लॅट क्षीरसागर यांना विकावा, त्यांनी फ्लॅट सोडून जावं यासाठी त्यांना वारंवार त्रास दिला जात असल्याची तक्रार वरपे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात येत आहे.
राजेश क्षीरसागर आणि राजेंद्र वरपे यांच्यातील वादामध्ये आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने उडी मारलेली आहे. क्षीरसागर यांच्या दमदाटीला शौर्य वरपे या मुलांना विरोध केला आणि त्यांच्यासोबत दोन हात केल्याने उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने शौर्य वरपे या मुलाचा हार घालून सत्कार ही करण्यात आला.
राजेंद्र वर्पे यांच्या कुटुंबीयांना जर पोलीस संरक्षण देणार नसतील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट हे त्यांना संरक्षण देईल आणि राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांना धडा शिकवतील असा इशारा कोल्हापूर शहराध्यक्ष रवी किरण इंगवले यांनी दिलेला आहे.