आढळराव यांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी : डॉ. अमोल कोल्हे यांचे खुले आव्हान
प्रतिनिधि : अमितकुमार टाकळकर
राजगुरूनगर | शिरूर लोकसभेची ही निवडणूक ‘पक्षनिष्ठा विरुद्ध बेडूकऊड्या’ अशी आहे. खेडचे विमानतळ गेलं हे मोठं ‘पोलिटिकल ब्लडंर’ आहे. मी विकासकामांच्या बाबत समोरासमोर बसून चर्चा करण्यास तयार आहे, असं खुलं आव्हान डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजी आढळराव यांना दिले. खेड तालुक्यातील वाकी येथील राजरत्न हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कोल्हे यांनी पंचवार्षिक कामगिरीबाबत सविस्तर भूमिका मांडली.
याप्रसंगी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, आम आदमी पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर, सुधीर मुंगसे, ऍड. विशाल झरेकर, ऍड. निलेश कड, ऍड. देविदास शिंदे, ऍड. दीपक चौधरी, कुमार गोरे, हरिप्रसाद खळदकर आदी उपस्थित होते. डॉ. कोल्हे म्हणाले की, माझा पिंड राजकारणाचा नाही म्हणजे काय या आरोपाचे अजित पवार यांनीच संदर्भासह स्पष्टीकरण द्यावे. इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पामुळे १५ हजार नागरिकांना रोजगार मिळणार आहे. पुणे नाशिक महामार्गाची टेंडर प्रकिया सुरु असून २०२६ अखेर नाशिक फाटा ते चांडोली हा इलेव्हेटेड मार्ग पूर्ण होईल.
तुम्ही पुढील पाच वर्ष नियमितपणे संपर्कात राहणार याची गॅरंटी कोण देणार असे पत्रकारांनी विचारले असता डॉ. कोल्हे म्हणाले की सर्वासामान्य जनतेचा आवाज संसदेत पोहचवणार याची गॅरंटी देतो. केंद्रात मोदी सरकार येणार नाही याची गॅरंटी मला आहे. दिल्ली व आसपासच्या ५५ लोकसभा जागा जिंकण्यासाठीच अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. मोदी सरकार प्रादेशिक पक्षांचे खच्चीकरण करीत आहे, असा आरोप डॉ. कोल्हे यांनी केला.
आढळराव यांना नाईलाजाने उमेदवार करण्यात आले आहे. ज्यांच्या विरोधात २० वर्ष टोकाचा संघर्ष केला, अशा कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणार नाही. येत्या आठ दिवसात त्यांच्यातील भांडणे सर्वांना पहायला भेटतील. माझी २ वर्ष कोरोनात गेली. त्यामुळे आढळरावांचा २० वर्षांतील संपर्क व माझा ३ वर्षांचा संपर्क याची तुलना होऊ शकत नाही. एकाच टर्म मध्ये ३ वेळा संसदरत्न पुरस्कार ही माझ्या उल्लेखनीय कामाची पावती आहे. ‘बंदर क्या जाने अदारक का स्वाद’ असा टोला त्यांनी टिकाकारांना लगावला.