शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची : दानवे

लोणावळा : खरी शिवसेना कोणाची, याचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे टोलवला आहे, यावर बोलताना अंबादास दानवे यांनी खरी शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची आहे, असे सांगितले.
लोणावळ्यात आज अंबादास दानवे यांनी लोणावळा शिवसेना संपर्क कार्यालयाला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, जिल्हा उपप्रमुख भारत ठाकूर, सुरेश गायकवाड, शांताराम भोते, युवासेना जिल्हाधिकारी अनिकेत घुले, तालुका अधिकारी विजय तिकोणे, शैला खंडागळे आदी उपस्थित होते.
अडचणीच्या काळात जो शिवसेनेसोबत आहे, तोच खरा शिवसैनिक असे कार्यकर्त्यांना सांगताना अंबादास दानवे म्हणाले, आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. पक्ष चिन्ह कोणाला मिळणार, या विषयात तुम्ही पडू नका, बाळासाहेबांचे विचार व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. शिवसेना कोणाची आहे, हे जगाला माहिती आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे.