आढळरावांच्या व्यक्तव्यानंतर अधिक चर्चेत आलेल्या असंसदीय संसद रत्नाचे वास्तव !
Sansad Ratna Award : “लोकसभेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी मिळणारा ‘संसदरत्न पुरस्कार’ म्हणजे फसवेगिरीचा प्रकार आहे, या पुरस्कारांचा सरकारशी कोणताही संबंध नसतो. चेन्नईत बसून संसदरत्न पुरस्कार वाटले जातात”, असे वक्तव्य माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एका सभेत बोलताना केले. खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना संसदरत्न पुरस्कारांच्या विश्वासर्हतेवरच त्यांनी शंका उपस्थित केली. मग यानंतर प्रश्न उपस्थित राहतो की हा पुरस्कार खरंच किती महत्वाचा आहे ? किंवा हे पुरस्कार नेमके काय आहेत? तसेच या पुरस्कारांचे निकष काय आणि ते कुणाला दिले हे जातात जाणून घेऊया..
संसदरत्न पुरस्कार काय आहेत ?
१९९९ या वर्षात स्थापन झालेल्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या एनजीओला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी संसद रत्न पुरस्काराबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर संसदरत्न हा पुरस्कार वार्षिक सन्मानांचा एक प्रतिष्ठित संच बनला जो संसद सदस्यांच्या प्रशंसनीय कामगिरीचा उत्सव साजरा करू लागला. ज्या खासदारांनी त्यांच्या संसदीय कर्तव्यात उत्कृष्टतेचे प्रदर्शन केले आहे, कायदेमंडळ प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांना ओळखणे आणि त्यांचे कौतुक करणे हा या पुरस्काराचा प्राथमिक उद्देश आहे. हा एक प्रकारचा नागरी सन्मान समजला जातो. लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात.
सुरुवात अशी झाली..
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या शैक्षणिक कार्यातून प्रेरित होऊन तसेच त्यांच्या निर्देशावरून २०१० साली या पुरस्काराची घोषणा झाली. त्यांच्या हस्तेच पहिल्या संसदरत्न पुरस्काराचे वितरण चेन्नई येथे करण्यात आले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक खासदारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
विजेते कोण आणि कसे निवडतात ?
संसद रत्न पुरस्काराच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, पुरस्कार देणाऱ्या समितीमध्ये केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक यांसारखे यांसारख्या तज्ज्ञ लोकांचा समावेश आहे. हे लोक पुरस्कारासाठी नावांची शिफारस करत असतात. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे या समितीचे अध्यक्ष असून माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस कृष्णमूर्ती सह अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून ते हिवाळी अधिवेशन २०२२ संपेपर्यंतचा काळ सदस्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी निवडण्यात आलेला आहे. संसदेतील खासगी विधेयक, चर्चेतील सहभाग आदींमध्ये खासदारांचा सहभाग किती होता, या बाबी यामध्ये तपासल्या गेल्या आहेत. पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चने प्रदान केलेल्या माहितीवरुन सदस्यांच्या कामगिरीचा डेटा काढला जातो.
संसद रत्न पुरस्कार कुणाकडून दिला जातो ?
संसद रत्न पुरस्कार भारत सरकारकडून दिला जात नाही. पुरस्कार देणाऱ्या समितीमध्ये सरकारमधील सदस्यांचा सहभाग असला तरी पुरस्कार प्राइम पॉईंट या संस्थेकडून दिले जातात. १९९९ मध्ये प्राइम पॉईंट फाऊंडेश या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. संवाद जागरूकता वाढविण्यासाठी या फाऊंडेशनची सुरुवात करण्यात आली होती. तसेच आयआयटी मद्रासच्या माध्यमातून हे पुरस्कार सुरु करण्यात आले होते.
संसदरत्न २०२४
२०२४ या वर्षात संसद उत्कृष्ठ महारत्न पुरस्कार, संसद महारत्न पुरस्कार आणि संसदरत्न पुरस्कार या तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले गेले आहेत. यंदा ५ खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरविले गेले असून यामध्ये महाराष्ट्रातील दोन खासदारांचा यात समावेश आहे. तर ‘संसद उत्कृष्ठ महारत्न पुरस्कार’ तीन खासदारांना दिला असून महाराष्ट्रातील दोन खासदारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराची ही यंदाची १४ वी आवृत्ती आहे.
संसद उत्कृष्ठ महारत्न पुरस्कार २०२४
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी, महाराष्ट्र)
श्रीरंग आप्पा बारणे (शिवसेना, महाराष्ट्र)
भर्तृहरी महताब (बीजेडी, ओडिशा)
संसद महारत्न पुरस्कार २०२४
एन के प्रेमचंद्रन (आरएसपी, केरळ)
अधीर रंजन चौधरी (आयएनसी, पश्चिम बंगाल)
विद्युत बरन महतो (भाजप, झारखंड),
डॉ. हीना विजयकुमार गावित (भाजप, महाराष्ट्र)
वित्त समिती : जयंत सिन्हा
कृषी समिती : अद्दी गौदार
वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती समिती : विजयसाई रेड्डी आणि टी जी व्यंकटेश
संसदरत्न पुरस्कार २०२४
डॉ. अमोल रामसिंग कोल्हे (राष्ट्रवादी, महाराष्ट्र)
डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना, महाराष्ट्र)
सुकांता मजुमदार (भाजप, पश्चिम बंगाल)
कुलदीप राय शर्मा (आयएनसी, अंदमान आणि निकोबार बेटे)
सुधीर गुप्ता (भाजप, मध्य प्रदेश)