एका हातात स्टिअरिंग, दुसऱ्या हाताने चॅटिंग; शिवनेरी बसचा जीवघेणा प्रवास
पुणे | वाहन चालवताना मोबाईल वापरणे गुन्हा आहे. परंतु दादरहून पुण्याला येणाऱ्या शिवनेरी बसचा चालक मंगळवारी मध्यरात्री बस चालवताना मोबाइल चॅटिंग करीत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला. एका प्रवाशाच्या जागरूकतेमुळे हे प्रकरण समोर आले. चांदणी चौक ते स्वारगेटदरम्यान हा चालक बस चालविताना सतत मोबाइलवर चॅटिंग करत होता. त्यामुळे हा एक प्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ असून, एसटी महामंडळ प्रवाशांची सुरक्षा गांभीर्याने कधी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
https://x.com/PotdarDriving/status/1709619056050053573?s=20
याबाबत प्रवासी मृणाळ घोले-मापुस्कर यांनी सांगितले, की दादर ते स्वारगेट त्या शिवनेरी बसने प्रवास करीत होत्या. चांदणी चौकात मध्यरात्री बस आल्यानंतर त्या उतरण्यासाठी पुढे आल्या, तेव्हा चालक बस चालविताना सतत मोबाइल चॅटिंग करत असल्याचे दिसून आले. त्या वेळी त्यांनी चालकास बस चालवताना मोबाइलवर चॅटिंग न करण्यास सांगितले; पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.
संबंधित चालक भाडे तत्त्वावरील ‘ई-शिवनेरी’चा असून, या घटनेनंतर ठेकेदाराला पत्र देऊन त्याला निलंबित करण्यात आले आहे. यापुढे विशेष पथकाच्या माध्यमातून चालक आणि वाहकांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे स्वारगेट आगारप्रमुख भूषण सूर्यवंशी यांनी सांगितले.