शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन! दोन्ही गटांकडून जय्यत तयारी
शिवसेना पक्षाचा आज ५८ वा वर्धापन दिन असून शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून दोन वेगवेगळे कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
९ जून १९६६ रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. त्यानंतर २०१९ ला उद्धव ठाकरे भाजपसोबत यूती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सामील झाले. पुढे २०२२ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनेक आमदारांना सोबत घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत.
हेही वाचा- “जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका…” मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन
त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेनाच खरी असल्याचा निर्णय देण्यात आला तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालं. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर यावर्षीचा दुसरा वर्धापन दिन आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंची शिवसेना वरळी डोम येथे वर्धापन दिन आयोजित करण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून षण्मुखानंद सभागृहात हा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला आहे. यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.