सानियासोबतच्या घटस्फोटावर शोएब मलिकची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “आता सानिया…”

मुंबई | Sania Mirza-Shoaib Malik Divorce – गेल्या काही दिवसांपासून टेनिस विश्वातील प्रसिद्ध महिला खेळाडू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि तिचा पती, पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) हे दोघं घटस्फोट (Divorce) घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या घटस्फोटाबाबत आता शोएब मलिकनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरुन त्यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे.
सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या बातमीनं नेटकऱ्यांना, चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता शोएबनं एका मुलाखतीमधून पहिल्यांदाच सानियासोबतच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार शोएबनं म्हटलं आहे की, आता जे काही मी ऐकतो आणि वाचतो आहे त्यावर मला एक गोष्ट निक्षुन सांगायची आहे, की हा आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला आता त्यावरुन एकटे सोडून द्या. मला त्यावर काय करता येईल ते मी पाहिलं पण आता सानिया देखील तुम्हाला अशा बातम्यांवर कोणतंही उत्तर देणार नाही.
दरम्यान, सानिया आणि शोएब एका शोमुळे शांत असल्याचं बोललं जात आहे. वास्तविक या दोघांनी मिळून एका शो ची अनाउसमेंट देखील काही दिवसांपूर्वी केली होती. त्यावरुन ते अजुनही एकत्र आहेत असं म्हटलं जात होतं. मात्र, आता शोएबची प्रतिक्रिया समोर आल्यानं वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे.