विनायक मेटेंच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा

मुंबई | Vinayak Mete Death – शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे. तसंच या अपघाताबाबत अनेकांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. अशातच मेटेंच्या अपघाताचा याआधीही प्रयत्न झाला असल्याचा खळबळजनक दावा शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब माळकर यांनी केला आहे.

यावेळी माळकर म्हणाले, “3 ऑगस्ट रोजी पुण्याजवळ दोन गाड्यांनी मेटेंच्या गाडीचा 2 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला होता. त्यात एक अर्टिगा कार होती आणि दुसरी आयशर होती. मी विनायक मेटेंना म्हणालो की थांबून बघू. पण ते म्हणाले जाऊ दे, प्यायलेले आहेत. आम्ही बैठकीसाठी बीडहून येत होतो. आमच्या गाडीच्या पुढे आयशर होती. मागून एक अर्टिगा कार कट मारत होती. त्यात तीन-चार लोक बसले होते. विनायक मेटेंची गाडी समाधान वाघमोडे चालवत होता. तीन ऑगस्टला पुण्याच्या अलिकडे शिक्रापूरजवळ हा प्रकार घडला”, अशी माहिती अण्णासाहेब माळकर यांनी दिली आहे.

दरम्यान, आता बीड येथील शिवसंग्रामचे कार्यकर्ते माळकर यांनी केलेल्या या धक्कादायक दाव्यानंतर या घटनेला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. अपघातानंतर मेटेंच्या चालकानेही मदत मिळायला उशिर झाल्याचं म्हटलं आहे.

Sumitra nalawade: