धक्कादायक ! महिलेच्या खुनाने खळबळ
डोके, हात, पाय नसलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
पुण्यातील चंदन नगर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खराडी येथील मुळा मुठा नदीपात्रात पाय आणि डोके नसलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडला. सोमवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी प्राथमिक माहिती अशी की, चंदन नगर परिसरातील मुळा मुठा नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना या ठिकाणी हात पाय आणि डोके नसलेले एक धड सापडले. एका अनोळखी महिलेचे हे धड होते. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खून करून हा मृतदेह नदीत टाकून दिल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
यातील मयत महिलेचे वय अंदाजे १८ ते ३० इतके आहे. तिची ओळखही अद्याप पटली नाही. चंदन नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.