दाटीवाटीत सुरू झालेले शोरूम झाले धोकादायक

नियम बसवले धाब्यावर : अग्निशमन दलाचा टँकरही जाऊ शकत नाही
पुणे : काल रात्री पुण्यामधील ई-बाईक शोरूमला आग लागल्यामुळे तब्बल सात गाड्यांचे नुकसान झाले, परंतु सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. चार्जिंगच्या पॉईंट्सवरून लागलेली ही आग पाहिल्यानंतर येथे कुठल्याही अग्निप्रतिबंधक नियमांचा अमल केला नसल्याचे दिसून आले. पर्यावरणपूरक बाईक म्हणूनही बाईकचा बोलबाला होत असला आणि त्याला सरकारने अनेक सोयी-सवलती दिल्या असल्या तरीदेखील अगदी लहान जागेमध्ये दाटीवाटीने सुरू झालेले शोरूम हेदेखील आता धोकादायक बनत असल्याचे दिसते. पेट्रोलवरील बाईकसारख्या शोरूमला जे नियम लागतात ते याही बाईक्सला लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे लहान-मोठा उद्योजक फारशी काळजी न घेता मोजक्या जागेमध्ये या बाईक्स आणून त्याचा व्यवसाय सुरू करत असल्याचे दिसून आले आहे. परंतु कालच्या घडलेल्या घटनेमुळे मात्र चार्जिंगवर असलेल्या बाईक शोरूम किंवा विक्री केंद्र येथेदेखील काही नियमावली असण्याची गरज नव्याने दिसून आली.
पुण्यातील गंगाधाम चौकातील देवल ई बाईकच्या शोरूमला सोमवारी रात्री आठच्या सुमारास आग लागली.
अग्निशमन दलाच्या हेडक्वार्टर, कोंढवा व भवानी पेठ अग्निशमन दलाच्या केंद्राकडून चार गाड्या व एक टँकर घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. शोरूममध्ये बाईकची चार्जिंग सुरू होती. चार्जिंगचे पोर्ट किंवा चार्जर गरम होऊन आगीला कारण ठरले असल्याची शक्यता आहे.
ई-बाईक चालवताना किंवा त्यांची विक्री करीत असताना अद्याप तर इतर वाहनांप्रमाणे शासन किंवा वाहतूक विभागाकडून कोणतेही नियम आखले गेलेले नाहीत. त्यामुळे अगदी २०० ते ३०० स्क्वेअर फूट जागेतही शोरूम बनवले जातात. त्यासाठी कोणत्या परवान्याची गरज नसते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच ई-बाईक विक्रीसाठी योग्य नियमावली बनवणे गरजेचे आहे.