तो येतो, धुतो अन् निघून जातो! समोरच्यांना धडकी भरवणारं टीम इंडियाचं नवं कोरं ‘रन मशीन’
मुंबई : (Shubhaman Gill Profile) तो येतो, तो धुतो आणि मॅच संपवून जातो! नाव शुभमन गिल. कसोटी, वन डे आणि टी 20, प्रत्येक फॉरमॅटमध्ये मॅच्युअर होत जाणारा टीम इंडियाचा (Team India) नवा प्रिन्स! नवं कोरं रन मशीन. मैदान मग ते कसोटीचं असो, वन डेचं असो किंवा मग टी ट्वेण्टीचं, शुभमनची सुपर इनिंग ठरलेलीच.
वन डे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा धाकड सलामीवीर. यंदाच्या वर्षात सर्वात सातत्यपूर्ण करणारा खेळाडू म्हणून शुभमन गिल समोर आला. गिलने यंदा सर्वच्या सर्व फॉरमॅटमध्ये शतकं झळकावण्याचा पराक्रम गाजवलाय.
शुभमन गिल विश्वचषक 2023 मध्ये रोहित शर्मासोबत सलामीला येऊन हुकूमी खेळी खेळतोय. विश्वचषकापूर्वी तुफान फॉर्ममध्ये असलेल्या गिलला डेंग्यूने गाठलं आणि अख्ख्या भारताच्या काळजाचा ठोका चुकला. गिल पहिल्या काही सामन्यांना मुकला, मात्र हायव्होल्टेज पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गिलने गर्जना केली. शुभमन गिल मैदानात असणं हे समोरच्या टीमसाठी धडकी भरवणारं आहे.
शुभमन गिलने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 80 धावा ठोकल्या. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमीच्या धडाकेबाज कामगिरीमुळे गिलच्या 80 धावांच्या खेळीकडे काहीसं दुर्लक्ष झालं. मात्र पायात क्रॅम्प येऊन मैदानाबाहेर गेलेल्या गिलने केलेली खेळी, न्यूझीलंडचा संघ कधीही विसरु शकणार नाही.