Siddique Kappan Release : उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेनंतर हिंसाचार आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले पत्रकार सिद्दीक कप्पन यांची गुरुवारी सकाळी तुरुंगातून सुटका करण्यात आली. पत्रकार सिद्दीक कप्पन यांची 27 महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. दोन खटल्यांमध्ये त्यांना जामीन मिळाल्यानंतर एक महिन्याहून अधिक काळ लोटला, लखनऊ येथील विशेष न्यायालयाने कप्पन यांच्या सुटकेच्या आदेशावर आज स्वाक्षरी केली.
23 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने सिद्दीक कप्पन यांना जामीन मंजूर केला होता. उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर, पीएमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजय शंकर पांडे यांनी कप्पन यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या दोन जामीन आणि तेवढ्याच रकमेच्या जामीनावर सोडण्याचे आदेश दिले.
कप्पन यांच्या वतीने गेल्या 9 जानेवारी रोजी न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने जामीनदारांची स्थिती पडताळण्याचे आदेश दिले. बुधवारी जामीनदार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यावर न्यायालयाने आरोपींना सोडण्याचे आदेश दिले आहेत.