इतरक्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘सिकंदर’ ठरला महाराष्ट्र केसरी; गतविजेता शिवराजला केले चितपट

पुणे | Sikandar Shaikh : कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने (Sikandar Shaikh) अवघ्या साडे पाच सेकंदात ६६व्या महाराष्ट्र केसरीचा (Maharashtra Kesari) किताब पटकावला. अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला (Shivraj Rakshe) ५.३७ सेकंदाला झोळी डावावर चितपट केले.

प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये स्पर्धा झाली.

अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरचे पारडे निश्चित जड होते. पण, शिवराज त्याला आव्हान देईल अशी अपेक्षा होती. मात्र, वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे शिवराजचा निभाव लागला नाही. लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदात सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळविला.

पारितोषिक वितरणप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे, योगेश दोडके यावेळी उपस्थित होते. विजेत्या सिकंदरला थार गाडी, गदा असे पारितोषिक देण्यात आले. उपविजेता शिवराज ट्रॅक्टरचा मानकरी ठरला.

त्यापूर्वी, माती विभागात झालेल्या अंतिम लढतीत पहिल्या फेरीतच सिकंदरने संदीपवर सातत्याने ताबा मिळवत सलग दोन गुणांचा सपाटा लावला आणि दहा गुणांची वसुली करत तांत्रिक वर्चतस्वावर विजय मिळवून किताबी लढतीत प्रवेश केला होता. गादी विभागात शिवराज राक्षेने कमालीचा चपळपणा दाखवत हर्षद कोकाटेचा तांत्रिक वर्चस्वावर पराभव करून अंतिम फेरी गाठली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये