सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक दुर्मिळ आजाराने त्रस्त; अचानक दोन्ही कानांनी ऐकू येणं बंद
बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना एका दुर्मिळ आजाराची लागण झाली आहे. अलका याज्ञिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. अलका म्हणाल्या की त्यांना कानाशी संबंधित समस्या निर्माण झाली आहे. यामुळे त्यांना काहीही ऐकू येणं बंद झालं आहे. सध्या त्या या आजारातून बऱ्या होत आहे. एका व्हायरल अटॅकनंतर त्यांना हा त्रास सुर झाला असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हणलं आहे.
डॉक्टरांनी अलका याज्ञिक यांना दुर्मिळ सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस आजाराचे निदान केले आहे. डॉ. ओमवीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्मिळ सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस हा एक दुर्मिळ आजार आहे. या आजाराची लागण झालेल्या रुग्णाला काहीही ऐकण्यात अडचण येते. ही समस्या कानाच्या आतील भागात किंवा कोक्लीयामध्ये असलेल्या पेशींना काही प्रकारचे नुकसान झाल्यामुळे उद्भवते. यामध्ये कानातून मेंदूपर्यंत आवाज पोहोचवणाऱ्या मज्जातंतूच्या पेशी खराब होतात. या समस्येमुळे अचानक काहीही ऐकू येणे बंद होते.
डॉ. कृष्ण राजभर यांच्या म्हणण्यानुसार सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस हा आजार जन्मजातही असू शकतो आणि ओटोटॉक्सिक औषधांमुळेही ही समस्या उद्भवू शकते. याशिवाय, डोक्याला काही दुखापत झाली असेल तर ते कानाच्या नसांनाही नुकसान पोहोचवू शकते. तसेच काही विषाणू आणि मेनिएर रोगामुळे देखील या आजाराची लागण होऊ शकते होते. हा आजार ओळखण्यासाठी, डॉक्टर ऐकण्याच्या क्षमतेची चाचणी घेतात. रुग्णाला किती ऐकू येत आहे आणि रुग्ण आवाजाला कसा प्रतिसाद देत आहे यावरुन त्या आजाराची गंभीरता लक्षात येते.
अलका याज्ञिक यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ९० च्या दशकात अलका याज्ञिक यांनी अनेक सुपरहिट गाण्यांना आपला आवाज दिला. भारतातील लोकप्रिय गायिकांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. त्यांनी गायलेली ‘तू शायर है मैं तेरी शायरी’, ‘गली में आज चांद निकला’,‘अगर तुम साथ हो’ सारखी गाणी खूपच गाजली. वयाच्या ५८ व्या वर्षीही अलका याज्ञिक अनेक स्टेज शोच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत.