सावधान! गुगल मॅपवरून सिंहगडावर जाताय? मग ही घटना वाचाच

पुणे | सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad Fort) दुचाकीवरुन फिरायला गेलेल्या तरुण-तरुणीने परतत असताना रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅपची (Google Map) मदत घेतली. मात्र गुगल मॅपने चुकीचा मार्ग दाखवल्याने ते मुंबई-बंगळुरू महामार्गावर आले. रस्ता चुकल्याचे त्यांच्या लक्षात आले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जाण्यासाठी वळण घेत असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकची धडक बसली. यामध्ये मागे बसलेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरात झाला आहे.

रिदा इम्तियाज मुकादम (वय २३) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार नटराज अनिलकुमार (वय ३०) हा तरुण जखमी झाला आहे. रिदा आणि नटराज खराडी भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहेत. ते दोघे सिंहगडावर फिरण्यासाठी गेले होते. त्यांना वानवडीला जायचे असल्याने ते गुगल मॅपवर रस्ता शोधत असताना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर आले. दुचाकी चालवत असलेल्या नटराज आणि रिदा बाह्यवळणावरुन नवीन कात्रज बोगद्याकडे गेले. नंतर आपला रस्ता चुकल्याचे नटराजच्या लक्षात आले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जाण्यासाठी वळण घेत असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकची धडक बसल्याने तरुणीचा मृत्यू झाला तर तरुणावर उपचार सुरु आहेत.

Dnyaneshwar: