तीस हजार कामगारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

पुणे : बांधकाम कामगारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण राबवित कुशल क्रेडाईने गेल्या ११ वर्षांत तब्बल एक लाखाहून अधिक बांधकाम कामगारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. बांधकाम कामगारांसाठी अशाप्रकारचे शास्त्रीय प्रशिक्षण उपक्रम राबविणारी कुशल क्रेडाई ही पहिली संस्था ठरली आहे. याबाबत कुशल आणि क्रेडाई पुणे मेट्रोच्या कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ म्हणाले, २०१० मध्ये जेव्हा नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) ची स्थापना झाली, तेव्हा क्रेडाई पुणे मेट्रोने २००० बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी क्रेडाई नॅशनलच्या वतीने प्रस्ताव देण्याचा निर्णय घेतला.
क्रेडाईचे अध्यक्ष सतीश मगर यांच्या कार्यकाळात एनएसडीसीने आमचा प्रस्ताव मंजूर केला आणि अशाप्रकारे कुशल ही क्रेडाई नॅशनलची प्रशिक्षण शाखा सुरू झाली. याअंतर्गत आतापर्यंत १ लाखाहून अधिक कामगारांना बांधकाम क्षेत्र कौशल्य परिषद’द्वारे मान्यता दिलेल्या विविध ब्रीज कोर्सेसमध्ये प्रशिक्षण दिले आहे. यासाठी क्रेडाई पुणे कुशलच्या आदेशाने आम्हाला प्रशिक्षणाचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र विकसित करावे लागत असल्याचे सांगितले.