म्हणुन… गुप्तहेर प्रमुख स्विकारणार रशियाच्या राष्ट्रपतीपदाचे सुत्रे

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या घटनेला दोन महिने उलटून गेले आहेत. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला होता. मात्र दोन महिने उलटून गेले असले तरी रशियाला युक्रेनवर पाहिजे तसे यश मिळवता आले नाही. तर दुसरीकडे जगभरातून रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. असं असताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या प्रकृतीबाबत एक बातमी समोर आली आहे. पुतिन यांना कर्करोगाचे निदान झाले असून लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे देशाची सूत्र माजी गुप्तहेर प्रमुख निकोलाई पात्रुशेव यांच्याकडे तात्पुरती सोपवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, पुतिन यांना १८ महिन्यांपूर्वी पोटाचा कर्करोग आणि पार्किन्सन आजार झाला आहे. अशात युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे आधीच शस्त्रक्रिया लांबवली आहे. मात्र आता ९ मेच्या विजय दिनाच्या परेडनंतर शस्त्रक्रिया करणार असल्याचं बोललं जात आहे. दुसऱ्या महायुद्धात रशियन सैन्याच्या शौर्याच्या स्मरणार्थ दरवर्षी मॉस्कोच्या रेड स्क्वेअरवर ही परेड आयोजित केली जाते. व्लादिमीर पुतिन अध्यक्ष म्हणून या परेडमध्ये सहभागी होणार आहेत.
त्यानंतर देशाची सत्ता रशियन सुरक्षा परिषदेचे प्रमुख आणि माजी गुप्तचर प्रमुख निकोलाई पात्रुशेव यांच्या हातात दोन ते तीन दिवसांसाठी असेल. पात्रुशेव हे पुतिन यांचे सर्वात जवळचे नेते असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत ते युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशियाच्या विशेष लष्करी कारवाईचेही नेतृत्व करतील.