पुणेशिक्षण

“ग्रामीण-शहरी मुलांमध्ये संवाद हवा”; सामाजिक कार्यकर्ते अनिकेत प्रकाश आमटे

पुणे : शहरी भागातील पालक समानतेच्या गप्पा मारतात. मात्र प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ येते तेव्हा आपल्या मुलांना खासगी इंग्रजी शाळांमध्ये पाठवतात. मुलांना महागडे मोबाईल घेऊन देतात. पण, हेमलकसासारख्या दुर्गम भागातील मुलांना पायाभूत शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे शहरी भागातील मुलांना सभोवतालच्या वातावरणाविषयी विचार करायला भाग पाडण्यासाठी त्यांचा ग्रामीण मुलांबरोबर संवाद वाढविण्याचे प्रयत्न व्हायला पाहिजेत, असे मत सामाजिक कार्यकर्ते अनिकेत प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.

लायन्स अँड लिओ क्लब ऑफ पूना शिवाजीनगरच्या ३५व्या वर्धापनदिनानिमित्त शास्त्री रस्त्यावरील सॅफरॉन बॅन्क्वेट येथे आयोजित कार्यक्रमात अनिकेत आमटे यांना लायन्स सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. क्लबचे सेक्रेटरी नीलेश कुलकर्णी, खजिनदार संजय मुनोत, डॉ. अनिल तोष्णीवाल, डॉ. ज्योति तोष्णीवाल, जगदीश बांगड, व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर परमानंद शर्मा, शमा शर्मा, विजय जाजू आदी यावेळी उपस्थित होते.

शाळांचे रूप बदलण्याची गरज

शालेय शिक्षणात गरीब मुलांना सर्वतोपरी सामावून घेण्यासाठी शाळेचंही रूप बदलून नवं रूप आणण्याची गरज आहे. शाळेत ‘शिक्षण’ म्हणून जे काही दिलं जातं, त्याचाच विस्तार करून नव्या, शास्त्रसिद्ध अनेक गोष्टी शाळांमधून धीटपणे आणण्याची गरज आहे.

यावेळी क्लबचे अध्यक्ष म्हणून जीवन हेंद्रे, लियो क्लबच्या अध्यक्षा किमया हेंद्रे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारला. बांगड यांनी मागील दोन वर्षात केलेल्या कामांचा अहवाल सादर केला. त्यांच्या टीमने विविध सामाजिक कार्याची उभारणी करतानाच त्यासाठी सुमारे बारा लाख रुपयांचा खर्च केल्याचे बांगड यांनी यावेळी सांगितले. परमानंद शर्मा यांनी नव्या सदस्यांना पदाची शपथ दिली.

अनिकेत आमटे म्हणाले, हेमलकसा, आनंदवन या भागात प्रकाश आमटे यांच्या परिश्रमातून अनेक सामाजिक कामे करण्यात आली. सध्या ते आजाराशी लढत आहेत. ते लवकरच बरे होतील. गेल्या वीस वर्षांपासून मीसुद्धा माझ्या परीने समाजकार्यात योगदान देत आहे. मात्र, वीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शाळांमध्ये शिकून मोठी झालेली मुले सध्या विविध क्षेत्रात कामगिरी करत आहेत. हे यश बघण्यासाठी संयमाची आवश्यकता असते.

ते पुढे म्हणाले, लोकांच्या आग्रहास्तव अनेक सामाजिक कामे सुरू झाली. शहरातील नागरिकांना आपले दुःख मोठे वाटते. पण त्यांनी ग्रामीण भागातील माणसांचे दुःख पाहिल्यास त्यांना आपले दुःख खूपच कमी असल्याचे जाणवेल. त्यासाठी सर्वांनी हेमलकसा, आनंदवनला भेट द्यावी. मुलांना ग्रामीण व दुर्गम भागातील स्थिती दाखवावी. तसे झाल्यास ग्रामीण-शहरी मुलांमध्ये संवाद वाढेल.

जीवन हेंद्रे म्हणाले, लायन्स क्लबच्या माध्यमातून भविष्यात विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये सदस्यांचे अनुभव आणि नेतृत्वाच्या मदतीने सामाजिक कार्याचा विस्तार करण्यात येईल. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सदस्यांची मदत घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये