ताज्या बातम्या

सोशल मीडियापासून व्यसन मुक्ती!

Social Media Addiction : आजच्या काळात खासकरून कोविडनंतर मोबाईलच्या अतिवापरामुळे स्क्रीन ॲडिक्शन खूप वाढले आहे.  पालक, शाळा, सायकॉलॉजिस्ट, डॉक्टर्स या सगळ्यांकडून हेच सतत ऐकायला मिळते. याचे कारण मोबाईल ॲडिक्शन हा प्रकार फक्त अभ्यासावर किंवा फक्त तब्येतीवर परिणाम करत नाहीत तर तो झोप, तब्येत, अभ्यास, नातेसंबंध, आत्मविश्वास, आनंद, समाधान, ध्येय या सगळ्याच गोष्टींवर नकारात्मक परिणाम करतो आणि म्हणून स्क्रीन ॲडिक्शनच्या कारणांचा, परिणामांचा आणि उपायांचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.

मोबाईलच्या एका क्लिकवर शॉपिंग, ओटीटी प्लॅटफॉर्मवर बिंज वॉचिंग, गेम्स, रिल्स ,व्हाॅट्सॲप, सोशल मीडिया, पोर्नोग्राफी असे अनेक पर्याय मोबाईलच्या मुलांना आणि मोठ्यांना सर्वांनाच उपलब्ध आहेत. एखादी गोष्ट तुम्हाला बघायची नसेल तरीही ती इतक्यांदा स्क्रीनवर पॉप-अप होत राहते की कधी ना कधी कुठे ना कुठे सहज बघावं म्हणून क्लिक केलेल्या गोष्टीची कधी सवय लागून जाते हे कळत देखील नाही. तुम्ही जे बघता त्या सर्व गोष्टींचा अलगोरीदम फोन सेव्ह करून ठेवत असतो आणि त्याप्रमाणे त्याच त्याच प्रकारचे लिंक्स पुन्हा पुन्हा येत राहतात. त्यामुळे सोशल मीडियाकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा कल वाढत चालला आहे. परंतु जे लोक सोशल मीडियाचा वापर मनोरंजनासाठी किंवा एकटेपणा दूर करण्यासाठी करतात, त्यांचे मानसिक आरोग्य इतरांपेक्षा वाईट असते. यातून स्वतःला वाचवायचे असेल, तर काही काळ सोशल मीडियापासून ब्रेक घेणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

सोशल मीडियापासून लांब रहा

सोशल मीडियापासून प्रयत्नपूर्वक आठवड्यात किमान एक दिवस दूर राहा. दररोज आधीच्या दिवसापेक्षा पाच ते दहा मिनिटे आधीच आपला सोशल मीडियाचा वापर थांबवा. असे पाच ते सहा दिवस केले तरी सातव्या दिवशी किमान एक तास तरी सोशल मीडियापासून दूर राहता येईल, असे अनेकांना आढळेल. जाणीवपूर्वक या एक तासाचे रुपांतर दोन तास, तीन तास करत संपूर्ण एक दिवस सोशल मीडियापासून दूर राहणे यामध्ये करणे हिताचे आहे.

थोडा ब्रेक घ्या

आपण सोशल मीडियावर सतत वेळ घालवत असू तर आपण टाईमपास करतोय असे नाही. काही वेळा आपण चांगल्या गोष्टींसाठीही त्याचा वापर करु शकतो. पण सतत सोशल मीडियावर अॅक्टीव्ह राहील्यास मानसिक तणाव आपल्यावर हावी झाले आहेत असा याचा अर्थ होतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला अशाप्रकारे तणाव आहे असे वाटेल तेव्हा काही दिवसांसाठी सोशल मीडियापासून लांब राहा. ज्या लोकांना आपल्याशी कनेक्ट राहायचे असते ते आपली नक्की वाट पाहतात यावर विश्वास ठेवा.

सिलेक्टीव्ह राहायला शिका

सोशल मीडियावर रोज हजारो गोष्टी अपडेट होत असतात. ती प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित पाहीजे आणि आपण ती पाहिली पाहिजे असे नाही. यामुळे आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा वेळ विनाकारण वाया जातो. त्यामुळे सोशल मीडियावर सिलेक्टीव्ह राहणे आवश्यक आहे. आपल्या गरजेनुसार आपल्याला आवश्यक असणाऱ्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचा सोशल मीडियाचा वापर निश्चितच अर्थपूर्ण होईल.

थोडक्यात आनंदी राहा

एकावेळी भरपूर पोस्ट केल्यावर तुमच्याकडे लोकांचे लक्ष वेधले जाईल असे नाही. त्यामुळे विनाकारण एकामागे एक पोस्ट करत राहणे यात काहीच तथ्य नसते. जे पोस्ट कराल ते चागंले असेल याकडे लक्ष द्यायला हवे. उगाचच कोणाशीही जोडले जाऊन स्वत:चा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा जे चांगले आहेत आणि तुमच्या विचारांशी ज्यांची विचारधारा जुळते त्यांच्याशीच कनेक्ट राहा.

क्रीएटीव्ह राहण्याचा प्रयत्न करा

सतत मोबाईल आणि लॅपटॉपवर अवलंबून राहू नका, कधीतरी ही उपकरणे बाजूला ठेऊन तुम्हाला आतून आवडतील अशा गोष्टी नक्की करा. त्या तुम्हाला नक्कीच जास्त आनंद देऊन जातील. यामध्ये चित्रकला करणे, लिहीणे अगदी शिवणकाम किंवा एखादी छान शोभेची वस्तू बनविणे असे काहीही असू शकेल. त्यामुळे तुमचा आतला आवाज ऐकायला शिका. त्यामुळे तुम्ही नक्कीच जास्त आनंदी व्हाल.

सोशल मीडियापासून लांब कसं राहायचं ?

नोटीफिकेशन हे सोशल मीडियाकडे आकर्षित करणारे मुख्य कारण असते. कारण त्यातून आपल्याला कोणी मेसेज केला आहे किंवा कोणी एखादी पोस्ट शेअर केली आहे याची माहिती मिळते आणि आपण ते लगेच पाहतो, त्यात व्यस्त होतो. म्हणून यापासून लांब राहण्यासाठी नोटीफिकेशन बंद करा.

बऱ्याचदा होम स्क्रीनवर सोशल मीडिया अ‍ॅप्स असल्यास ते सतत उघडून पाहण्याची इच्छा होते किंवा ते व्यसनच पडते. त्यामुळे असे अ‍ॅप्स होम स्क्रीनवरुन काढुन टाकल्यास सतत अ‍ॅप्स उघडून पाहण्याची सवय मोडू शकते.

अनेकांना सकाळी उठल्यावर सर्वात आधी फोन चेक करण्याची सवय असते, यामुळे बराचसा वेळ वाया जातो. त्यामुळे सकाळी उठल्यावर फोन पाहण्याऐवजी योगा, व्यायाम अशा चांगल्या सवयी स्वतःमध्ये रुजवा.

तुम्ही सोशल मीडियावर किती वेळ घालवता हे तपासा, यावरून तुम्हाला तुमचा किती वेळ वाया जात आहे याचा अंदाज येईल आणि तुम्ही वेळेबाबत अधिक जागृक व्हाल आणि यातून तुमचा सोशल मीडियावरील वेळ कामी लागेल.

जर तुम्हाला महत्त्वाचे काम किंवा परीक्षा असेल आणि सोशल मीडियामुळे वेळ वाया जात असेल. तर तुमचा फोन वेगळ्या खोलीत ठेवा, यामुळे लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल आणि त्यामुळे फोन तुमच्यापासून लांब राहील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये