कोई आता है…

अनुपमा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित. राष्ट्रीय फिल्म पुरस्कार प्राप्त. राजेंद्रसिंह बेदी यांची कथा. मुलगी आणि वडील यांच्या नातेसंबंधांवर आधारलेली. हेमंतदांचं संगीत. अप्रतिम गाणी. संगीत नियोजन. कैफी आझमींचे शब्द. धी धी मचल ऐ दिले बेकरार कोई आता है…
कोणी येणार असतं आणि त्याच्या प्रतीक्षेच्या व्याकुळतेने काय होतं? चाहूल कशी लागते? आणि त्याच्या येण्याच्या स्वप्नात मनाची अवस्था कशी असते? या सगळ्याचं सहज वर्णन. कैफींनी तिचं अस्वस्थ होणं खूप तरलपणे चितारलंय. अस्वस्थ मनाचे हिंदोळे. तो येतो असं वाटत राहणं आणि त्याच्या चाहुलीने मन भरून येणं. सगळं अनुभवलं जाणारं. या अवस्थे प्रेमीजनांना नेहमी येणारी.
प्यासामधल्या कवीचे स्वगत ज्या ताकदीनं आणि आवेशाने आझमींनी मांडले त्याच्या नेमके विरुद्ध धृवाच्या, टोकाच्या तरल भावनांना व्यक्त शब्द या गाण्यात आहेत. धी धी मचल यातल्या धी धी या शब्दांना अनुसरून. अगदी हळुवार. त्या शब्दांमध्ये असलेले आपलेपण आणि नजाकत लताने ही अत्यंत सहजपणे जपली. मुळात हेमंतदा यांनी अतिशय हळुवारपणे हाताळलेलं हे गाणं. कोई आया है… कोई आता है… कोई आता है…
या आत्मविश्वासाला पेलणारं. असं अस्वस्थ होतं मला नको अस्वस्थ करू हे सांगणारं हे गीत. एखाद्याची वाट पाहायची. तो आला हे ओळखायचं. ते कसं तर त्याच्या येण्याच्या पावलांचा नाद असतो. वार्याची झुळूक तो येणार याचा निरोप देत असते आणि त्याच्या स्वागताला जायचं असेल तर? सजलं पाहिजे. नटलं पाहिजे. सोळा शृंगार केले पाहिजेत. त्याने मला पाहताक्षणी हरखून गेलं पाहिजे. सजणं, नटणं आवश्यक ना!
तो आल्याचा निरोप मिळतो, पण त्यापुढे जाऊन त्याच्या सावलीचा स्पर्शही मला होतो. नव्हे जाणवतो. सावली स्पर्श करते मला. सांगते तो आला. हे सगळं सुरांच्या आणि संगीताच्या सजावटीत होतं. शहनाई वाजल्याचा भास, तोही अगदी हृदयापाशी. स्वप्नाच्या अंगणात माझं प्रेम जिवलग येतो आणि गाणं गातो. माझ्यासाठी.
वाट पाहायला लावली. त्याच्यावर मी रागावणार. खूप रागावणार. खरं तर त्याला थोडा त्रास देणार, खोटाखोटा. मनापासून रागवायचं कारण नाही आणि हे रागावणंही माझं प्रेमच असेल. मी ते उशिरा आले, म्हणून रागावणार ते माझा राग काढणार. मग मोठ्या मुश्किलीने मी त्यांना माफ कन. खोटंखाटं रागावण्याचा खेळ संपेल.
अशा वेळी आवडीनिवडीचा खेळ कशाला खेळला जाईल? जे असेल ते आनंद आणि समाधान. अतिशय सुंदर शब्दात हा लटकेपणा, हूरहूर आणि स्वप्नरंजन व्यक्त केलंय. खट्याळपणापण समजूत, प्रेम वाढवणारा. गाणं प्रसन्न. चैतन्य निर्माण करणारं. छायाचित्रण आणि दिग्दर्शन अप्रतिम. जिन्याचा सुंदर वापर हृषीदांनी या गाण्यात केला आहे. वाद्यांचा सुख मेळ आणि शब्दांना दिलेला सोनेरी मुलामा. कोणाला तरी घेऊन येणारा.