सौरव गांगुलीची सुरक्षा वाढवली! दादा आता Z+च्या घेऱ्यात, कारण मात्र अस्पष्ट..

Sourav Ganguly Z+ Security : पश्चिम बंगाल सरकारने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी सरकार आता गांगुलीला झेड श्रेणीची सुरक्षा देणार आहे. नवीन सुरक्षा व्यवस्थेनुसार बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांवर आठ ते दहा पोलिसांची नजर असेल. Y-श्रेणी सुरक्षा कवचाखाली गांगुलीला तीन पोलिसांचे रक्षण होते.
बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांना यापूर्वी ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा होती. त्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी सरकारने गांगुलीची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. बंगाल सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “व्हीव्हीआयपी सुरक्षा संपल्यानंतर प्रोटोकॉलनुसार आढावा घेण्यात आला. त्यानंतर गांगुलीची सुरक्षा झेड श्रेणीत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दादाच्या सुरक्षेला काही धोका आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मंगळवारी, राज्य सचिवालयाचे प्रतिनिधी गांगुली यांच्या बेहाला कार्यालयात पोहोचले, जिथे त्यांनी कोलकाता पोलिस मुख्यालय लालबाजार आणि स्थानिक पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. “गांगुली सध्या त्याच्या टीम दिल्ली कॅपिटल्ससह प्रवास करत आहे आणि 21 मे रोजी कोलकाता येथे परत येईल. त्या दिवसापासून त्याला Z-श्रेणी सुरक्षा मिळण्यास सुरुवात होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
सौरव गांगुली यापूर्वी केंद्र सरकारच्या जवळ होता. दादांना आपल्या पक्षात येण्याची ऑफरही सत्ताधाऱ्यांनी दिली होती. भारताचा माजी कर्णधार मात्र यासाठी तयार नव्हता. यानंतर अचानक दोघांमध्ये खटके उडाल्याच्या बातम्याही समोर आल्याने सौरवला बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. आता बंगाल सरकारच्या वतीने दादांना झेड श्रेणीची सुरक्षा देणे हे नवे राजकीय समीकरण सूचित करते.