श्रीहरी, रक्षिता नवव्या फेरीअखेर आघाडीवर

पुणे : तमिळनाडूच्या रक्षिता रवी मुलींच्या गटात (८.५ गुण), तर मुलांच्या गटात पुद्दुचेरीच्या श्रीहरी एल याने ७.५ गुणांसह आघाडी प्राप्त करून एमपीएल राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत नवव्या फेरीअखेर आघाडीवर आहेत. पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेखाली पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात नवव्या फेरीत तमिळनाडूच्या महिला आंतरराष्ट्रीय मास्टर रक्षिता रवीला आपली राज्य सहकारी महिला फिडेमास्टर ज्योत्स्ना एल हिने २३ चालींमध्ये बरोबरीत रोखले.
रक्षिता रवीला या फेरीत बरोबरीत समाधान मानावे लागले असले तरी तिने ८.५ गुणांसह आपली आघाडी कायम ठेवली आहे. मुलांच्या गटात नवव्या फेरीत पुद्दुचेरीच्या श्रीहरी एल याने राजस्थानच्या वृशांक चौहानचा पराभव करून ७.५ गुणांसह आघाडी प्राप्त केली. जवळजवळ संपूर्ण डाव संपेपर्यंत वृशांकने डावावर वर्चस्व राखले होते. परंतु ५७ चालींत त्याने टाळता येण्यासारखी एक महत्त्वाची चूक केली व त्यामुळे एक महत्त्वाचा मोहरा गमावला व डावावरील वर्चस्वही गमावले. याचाच फायदा घेत श्रीहरीने ६५ चालींमध्ये वृशांकवर विजय मिळवला. महाराष्ट्राच्या ऋषभ गोखलेने पश्चिम बंगालच्या आलेख्य मुखोपाध्यायला बरोबरीत रोखले व ७ गुण मिळवले.