विश्वचषकापुर्वीच कांगारूंना मोठा धक्का, दोन दिग्गज खेळाडूंना दुखापतीचं ग्रहण
Steve Smith And Mitchell Starc Ruled Out : यंदाचे यजमानपद भुषवणाऱ्या भारततात येत्या 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे. विश्वचषकासाठी 50 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असतानाच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज खेळाडूंना दुखापतीने ग्रसले आहे. त्यामुळे विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधीच ऑस्ट्रेलियाला दुखापतीचे ग्रहण लागलेय. स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दुखापतग्रस्त झाले आहेत. या दोन्ही खेळाडूंनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतल्याचे समजतेय. विश्वचषकाच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियासाठी दक्षिण आफ्रिका दौरा महत्वाचा आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. त्या पार्श्वभूमिवर ऑस्ट्रेलिया संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार होता. पण स्मिथ आणि स्टार्क दुखापतग्रस्त झालेत. कर्णधार पॅट कमिन्स याने दुखापतीमुळे आधीच दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली आहे.
स्टीव्ह स्मिथ याच्या मनगटाला दुखापत झाली आहे. तर मिचेल स्टार्क याला कंबरेची दुखापत झाली आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडूंनी दक्षिण आफ्रिका मालिकेतून माघार घेतली आहे. स्मिथच्या जागी टी20 मध्ये एश्टर टर्नर याला स्थान दिलेय तर वनडेमध्ये मार्नस लाबुशेन याला स्थान दिलेय. मिचेल स्टार्क याच्या जागी जॉनसन याचा समावेश करण्यात आलाय.