मुंबईतील बाबा सिद्दीकी हत्याकांडातील दोन आरोपींचे गाव म्हणून चर्चेत आलेल्या बहराईच येथे एका विशिष्ट समुदायाने रविवारी दुर्गा विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून वाद घातला. मिरवणुकीवर दगडफेक केली. गोळीबारही केला. यात मिरवणुकीत सहभागी असलेला एक तरुण मरण पावला, तर अनेकजण जखमी झाले. सोमवारी पुन्हा वाद उफाळून आला आणि शहरात मोठी जाळपोळ झाली. एका हॉस्पिटलसह एक शोरूमही जमावाने पेटवून दिले. रविवारी हर्डी येथे दुर्गामूर्ती विसर्जनाच्या वेळी डीजे वाजवण्याला एका समुदायातील लोकांनी हरकत घेतली. मिरवणुकीवर मग दगडफेक झाली. २० हून अधिक गोळ्या मिरवणुकीवर झाडण्यात आल्या. राम गोपाल मिश्रा (वय २२) हा युवक त्यात मरण पावला व अनेक जण जखमी झाले. मिश्रा याच्या अंत्ययात्रेत ५ कि.मी.पर्यंत लोक सहभागी झाले होते. भाजपचे आमदार सुरेश्वर सिंहही होते. हा जमाव पुढे संतप्त झाला. नंतर जाळपोळ सुरू केली.
हैदराबादेत मंदिराची तोडफोड
तेलंगणातील हैदराबादमधील मुथ्यलम्मा मंदिरात सोमवारी पहाटे ४ वाजता विशिष्ट समुदायाच्या एका युवकाने देवीच्या मूर्तीची तोडफोड केली. या युवकाला पकडण्यात आलेले आहे. त्याविरुद्ध निदर्शने करणार्या भाजप नेत्या माधवी लता यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनीही त्याला आक्षेप घेतला.
बंगालमध्ये दुर्गामूर्ती जाळली
पश्चिम बंगालमध्ये रविवारी रात्री हावडा जिल्ह्यातील श्यामपूर भागात विशिष्ट समुदायाच्या लोकांनी दुर्गा मंडपाची तोडफोड केली. कट्टरवाद्यांनी दुर्गादेवीच्या मूर्तीलाही आग लावली. भाजपने हा विषय उचलून धरला असून, सत्ताधारी तृणमूलचे लांगुलचालन या प्रकारांना जबाबदार असल्याची टीका केली आहे.
बेळगावात हाणामारी
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सोलापूर गावात रविवारी रात्री एका समुदायातील घटकांकडून दुर्गादेवीच्या मूर्तीची विटंबना झाल्यानंतर दोन गटांत हाणामारी झाली. यात तीनजण जखमी झाले. दोन दुचाकी आणि कारचे नुकसान झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.