पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

प्रसंगावधानामुळे वाचले व्यक्तीचे प्राण

रांजणगावचे पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांचे यश

रांजणगाव गणपती : शेजारी राहणाऱ्या महिलेशी बोलला, म्हणून एका व्यक्तीने त्याचा गळा कापला. जिवाच्या आकांताने पळत त्याने मुख्य रस्ता गाठला आणि त्या रस्त्यावर असलेल्या एका चिकन दुकानदाराला त्याने जीव वाचविण्याची विनंती केली. त्या दुकानदाराने एका एका क्षणाचाही विलंब न करता मित्राच्या मदतीने दवाखान्यात नेले. पण गळ्याला झालेली जखम गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला खासगी दवाखान्यात दाखल करून घेण्यास नकार दिला. त्या दुकानदाराने त्याला रस्त्यात तसाच सोडत पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना सगळी परिस्थिती सांगितली. पोलिसांनी तातडीने त्याला खासगी दवाखान्यात नेत प्रथमोपचार केले आणि पुढील उपचारासाठी तातडीने पुण्यात सरकारी दवाखान्यात पाठवल्याने एका युवकाचा जीव वाचला आहे.

हा प्रसंग कोणत्याही चित्रपटातला नाही, तर शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील कारेगाव येथील असून रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांच्या प्रसंगावधानाने एका विकासकुमार नावाच्या सर्वसामान्य व्यक्तीचा जीव वाचला आहे. रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास कुमार (सध्या रा. फलकेमळा, कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. पांडेवार, ता. बाजगाव, जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) रांजणगाव एमआयडीसीत कामाला असून १८ सप्टेंबरला तो नेहमीप्रमाणे कामावरून रात्री ८.३० च्या सुमारास रूमवर आला. शेजारीच राहत असलेल्या महिलेला ‘भाभी खाना खाया क्या…?’ असे म्हणाला. त्यानंतर लगेचच आरोपी प्रशांत रमेश सरोदे रा. फलकेमळा, कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे (मूळ रा. पूर्णा सिद्धार्थनगर, ता. पूर्णा, जि. परभणी) याने विकासकुमार याच्या गळ्यावर लोखंडी कटरने वार केला. त्यानंतर घाबरलेल्या विकासकुमारने आपला गळा एका हाताने दाबत पुणे-नगर रस्त्याच्या कडेला असलेल्या संदीप आपाजी आढाव याच्या चिकनच्या दुकानात धाव घेत संदीप याला आपला जीव वाचविण्याची विनंती केली. त्यानंतर संदीपने एका क्षणाचाही विलंब न करता रुपेश बालाजी कांबळे या मित्राच्या मदतीने विकासकुमार याला दुचाकीवर बसवले आणि उपचारासाठी कारेगाव येथील खासगी दवाखान्यात नेले. परंतु विकासकुमारच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने दोन खासगी डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे संदीप आढाव याचा नाईलाज झाला. त्याने जखमी विकासकुमारला तसाच रस्त्यावर टाकून पळत जाऊन रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. त्यावेळेस ड्युटीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला.

पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांनी प्रसंगावधान राखत विकासकुमार याला कारेगाव येथील खासगी डॉक्टरांकडे नेले आणि त्याच्यावर प्रथमोपचार करूनपुढील उपचारासाठी पुण्यातील ससून वैद्यकीय रुग्णालयात पाठवले. पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये