“…नाही तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल”; सुप्रीम कोर्टाचा विधानसभा अध्यक्षांना शेवटचा अल्टिमेटम
नवी दिल्ली : (Supreme Court On Assembly Speaker) सर्वोच्च न्यायालयात आज विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाईच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले आहेत. आम्ही विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या वेळापत्रकाबाबत असमाधानी आहोत. सॉलिस्टर जनरल यांनी दसऱ्याच्या सुट्टी दरम्यान विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा करावी आणि सुधारीत वेळापत्रक द्यावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांना नवे वेळापत्रक सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबर ही शेवटची संधी देण्यात आली आहे. ३० तारखेला विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक सादर करावे लागेल असे न्यायालयाने म्हटलं आहे.
यावेळी विधानसभा अध्यक्षांना शेवटची संधी दिली जात आहे. या दसऱ्याच्या सुट्टीत सॉलिस्टर जनरल अॅड. तुषार मेहता यांच्यासोबत बसून विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक बनवावे. पुढील सुनावणीपर्यंत हे वेळापत्रक आलं नाही तर कोर्ट स्वत: वेळापत्रक देईल, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
आजही न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘अध्यक्षांनी दिलेल्या वेळापत्रकाबद्दल आम्ही समाधानी नाही’, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तुम्ही जर यावेळी ठोस वेळापत्रक देत नसाल, यासंदर्भातील याचिका निकाली काढत नसाल, तर आम्हाला नाईलाजाने यामध्ये दखल द्यावी लागेल, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे.