“एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत…”, सुप्रिया सुळेंचं सूचक विधान

इंदापूर | Supriya Sule – एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेसोबत बंडखोरी करून 40 आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात नवं सरकार स्थापन झालं. तसंच महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे राज्यातून गेलेली सत्ता पुन्हा आणण्यासाठी शरद पवार आता कोणती रणनीती अवलंबणार याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सूचक विधान केलं आहे. त्या इंदापूरमध्ये एका आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
“निवडणुकीत काय होतं हे आमच्यापेक्षा जवळून कोणी पाहिलेलं नाही. शरद पवारांचं 55 वर्षांचं राजकारण आणि समाजकारण पाहिलं तर त्यात जितके चढ आहेत तितकेच उतार आहेत. 55 वर्षांतील 27 वर्ष ते सत्तेत आणि 27 वर्ष विरोधात होते. पण मी नेहमी त्यांना महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलं आहे सांगते. पण विरोधात असताना महाराष्ट्रानं सर्वात जास्त प्रेम दिलं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात,” असं सूचक विधान सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या, “महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला असं सगळे म्हणत होते. रोज सकाळी उठलो की आज पक्ष सोडून कोण गेलं पहायचं. कोण गेलं नाही तर संध्याकाळी सुटकेचा निश्वास सोडायचो. दुसऱ्या दिवशी परत बातमी असायची. इतके लोक पक्ष सोडून जात होते की काही हिशोबच नव्हता. त्यानंतर दोन्ही खिशात काही नाही असं होतं. पण शरद पवार सोलापूरला गेल्यानंतर जी कुस्ती सुरू झाली, ती निकालाच्या दिवशीच संपली”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.