ताज्या बातम्या

“हे तर खुनी सरकार…” नांदेडच्‍या रुग्णालयातील मृत्‍यूसत्रावरून सुप्रिया सुळे यांची सरकारवर जहरी टीका

अमरावती | नांदेड मधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. त्यानंतर मंगळवारी अत्यवस्थ असलेल्या आणखी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 8 बालकांचा समावेश आहे. दोन दिवसांत तब्बल 35 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अत्यवस्थ असलेले 36 शिशुंसह 59 रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अमरावतीत प्रसार माध्‍यमांशी बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे ट्रिपल इंजिन सरकार हे खुनी सरकार आहे, असा आरोप राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. सध्‍याच्‍या सरकारचा कारभार आपण सर्व जण पाहत आहात. ज्‍या पद्धतीने या लोकांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले, त्‍यामुळे लोकांच्‍या मनात या सरकारविषयी रोष आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पुढे त्या म्‍हणाल्‍या, आयकर, सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून कोविड काळात चांगली कामगिरी करणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सरकार पाडण्‍याचे पाप भाजपने केले आहे. साम, दाम, दंड, भेद हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे शब्‍द अजूनही मला आठवतात. काहीही करा, पण जिंका, असे ते म्‍हणतात.

एकनाथ शिंदे यांच्‍या सरकारच्‍या काळात कुठली चांगली कामे झालीत, हे आपल्‍याला कुणीतरी सांगा. नांदेडच्‍या शासकीय रुग्‍णालयातील मृत्‍यूंना पूर्णपणे महाराष्‍ट्र सरकार जबाबदार आहे. मुख्‍यमंत्र्यांनी आरोग्‍य मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. कारण २५ हून अधिक लोक दगावले आहेत आणि त्‍यात १२ लहान मुले आहेत. या मुलांच्‍या आईला काय उत्‍तर देणार तुम्‍ही. ठाण्‍यात देखील असेच प्रकरण उघडकीस आले होते. आता नांदेडमध्‍ये मृत्‍यू झाले आहेत. इतर ठिकाणाहून देखील अशा बातम्‍या येताहेत, हे पूर्णपणे सरकारचे अपयश आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. या सरकारच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल झाला पाहिजे, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये