“माझी आई मला नेहमी सांगते की…”, मुलींनी साडी नेसण्याच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

पुणे | Supriya Sule – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या 43व्या अधिवेशनात बोलताना चॅनेलमधील मुलींनी साडी नेसण्याबद्दल विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरून अनेक नेत्यांनी टीका केली आहे. यामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही सुप्रिया सुळेंवर टीका करत त्यांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. दरम्यान, त्यांच्या या टीकेवर आता सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझं भाषण सुरू होण्यापूर्वी तिथे एक व्यापक चर्चा सुरू होती. त्या चर्चेला उद्देशून मी अनेक मुद्दे मांडले. मी भाषणात कोणावरही टीका केली नाही. मी फक्त माझं मत मांडलं. कोणी काय घालावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, हे सुद्धा म्हटलं होतं. त्यामुळे ते भाषण सर्वांनी ऐकावं. माझं 35 मिनिटांचं भाषण जर 17 सेकंदमध्ये दाखवण्यात येत असेल तर त्यावर काय बोलणार.”
पुढे त्यांनी चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली. “मी संविधानावर विश्वास ठेवणारी नागरिक आहे. त्यामुळे कोणी माझ्यावर टीका करत असेल तर त्याच चुकीचं काहीही नाही. तो त्याचा अधिकार आहे. माझी आई मला नेहमी सांगते की, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ त्यामुळे अशा टीकेचं मी स्वागत करते”, असंही सुळे म्हणाल्या.