मोदी आडनावावरून विनोद करणं राहुल गांधींना भोवलं; सुरत कोर्टाकडून 2 वर्षांची शिक्षा… नेमकं प्रकरण काय?
सुरत | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं आडनाव कॉमन कसे? सर्व चोरांची नावे मोदीच का असतात?” काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं हे विधान त्यांना भोवलं आहे. कर्नाटकातील एका रॅलीत राहुल गांधी यांनी असे वक्तव्य केले होते. या मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते. कोर्टाने जामीन दिल्यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
2019च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांची कर्नाटकात मोठी रॅली होती. 13 एप्रिल 2019 रोजी कोलार येथे ही रॅली पार पडली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं आडनाव एक सारखं कसे? सर्व चोरांची आडनावे मोदी का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता.
त्यावर भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेत सुरत कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानामुळे मोदी समुदायाचा अपमान झाला आहे. त्यांच्या विधानामुळे मोदी समुदायातील लोकांना मान खाली घालावी लागत आहे, असं पूर्णेश मोदी यांनी म्हटलं होतं.