टी-२०मध्ये सुर्याची तुफान खेळी, वनडेत मात्र फुसका बार; आकडेवारी पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
नवी दिल्ली : (Suryakumar Yadav ODI Match News) सध्या भारतीय क्रिकेटमध्ये फक्त एकाच नावाची चर्चा आहे. जगभरातील गोलंदाज ज्या फलंदाजाला चेंडू टाकण्यास घाबरतात अशा खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव होय. मैदानावर चारही दिशांना तुफान फटके मारणाऱ्या सूर्याला ‘मिस्टर ३६०’ असं नाव देण्यात आलं आहे. सूर्यकुमारने भारताकडून ४५ टी-२० सामन्यात ४६.४१च्या सरासरीने १ हजार ५४८ धावा केल्या आहेत. यात ३ शतक आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे.
टी-२० मधील स्टार असलेल्या सूर्याला वनडेमध्ये मात्र तशी धमाकेदार फलंदाजी करता आली नाही. वनडेमधील त्याची कामगिरीपाहून अशी चर्चा सुरू झाली आहे की, सूर्या फक्त टी-२०चा फलंदाज आहे. सूर्याची वनडेतील गेल्या १० डावात कामगिरी पाहिल्यावर चाहत्यांना धक्का बसेल. त्याने गेल्या १० डावात फक्त १६.८८च्या सरासरीने १५२ धावा केल्या आहेत. यात एकाही अर्धशतकाचा समावेश नाही, यात ३४ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
वनडेच्या तुलनेत सूर्यकुमारची टी-२० मधील आकडेवारी पाहिली तर त्याने टी-२० मध्ये गेल्या १० सामन्यात ८६.३३च्या सरासरीने ५१८ धावा केल्या आहेत. यात २ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. या सामन्यात त्याने २९ षटकार आणि ४७ चौकार मारलेत. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात सूर्याने २६ चेंडूत ३१ धावा केल्या. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. आता दुसऱ्या लढतीत त्याची बॅट किती तळपते हे पाहावे लागले.