“अण्णा हजारेंमुळेच भाजप…”, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
जळगाव | Sushama Andhare On Anna Hazare – शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला आहे. अण्णा हजारेंच्या (Anna Hazare) ‘जनलोकपाल’ आंदोलनावर सुषमा अंधारेंनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच सरकार उलथवून टाकण्यासाठी अण्णा हजारेंनी जनलोकपाल आंदोलन केलं असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. “तेव्हा आंदोलन करणारे अण्णा हजारे आज एवढे प्रश्न आहेत, पेच निर्माण होत आहेत पण त्यावर चकार शब्द बोलत नाहीत”, असं अंधारेंनी म्हटलं आहे. त्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “हो, अण्णा हजारेंमुळेच भाजप (BJP) सत्तेत आली. त्याबाबत मी शास्त्रशुद्ध मांडणी केली आहे. अण्णा हजारे लोकपालाची जी मांडणी करतात ती मागणीच मुळात संवैधानिक चौकटीच्या बाहेरची आहे. आपल्याकडील संसदीय लोकशाही मोडीत काढून अध्यक्षीय लोकशाही आणण्याचा तो एक प्रयत्न होता. त्यातील त्रुटी कधीच दाखवण्याचा प्रयत्न झाला नाही.”
“कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तिघे विभक्त असले पाहिजे ही मूळ चौकट आहे. जेव्हा या तिघांच्यावर लोकपाल बसवला जातो तेव्हा संवैधानिक चौकट मोडण्याचाच प्रयत्न होतो. माणसात निवडकपणा किती असतो, तेच अण्णा हजारे आज एवढे प्रश्न उभे राहत आहेत, पेच निर्माण होत आहेत पण त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
“अण्णा हजारेंचं लोकपाल आंदोलन केवळ इथलं एक सरकार उलथवून लावायचं, लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करायची आणि एक लाट तयार करायची यासाठीच होतं. लोकपाल आंदोलनातील त्रुटी कधीच दाखवल्या गेल्या नाहीत,” अशी टीकाही अंधारेंनी केली आहे.