“निवडणूक आयोगाने कानात येऊन…”; हेमंत रासनेंच्या कसब्यातील फ्लेक्सबाजीमुळे सुषमा अंधारेंची टोलेबाजी

पुणे | उद्या 2 मार्च रोजी कसबा पोटनिवडणुकाचा निकाल लागणार आहे. कसब्यासह चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकाचा निकाल लागणार आहे. त्यातच सध्या फ्लेक्सबाजीचा ट्रेंड सुरु आहे. अशातच कसब्यात थेट भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या विजयाचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्याबद्दल हेमंत रासने यांचं अभिनंदन असं फ्लेक्सवर लिहिलेलं आहे. त्यामुळे कसब्यात चर्चांना उधाण आलं आहे. निकाला आधाची भाजपने फ्लेक्सबाजी कशी सुरू केली? भाजपला कसब्याचा निकाल आधीच माहीत आहे काय? असे सवाल या निमित्ताने केले जात आहेत. तर, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही या फ्लेक्सवरून भाजपला चांगलीच टोलेबाजी केली आहे.
कसब्यात हेमंत रासने यांचा भला मोठा फ्लेक्स लागला आहे. त्यात विजयी मुद्रेतील फोटो लावण्यात आला आहे. त्यावर यतो धर्म: ततो जय: असं लिहिलंय. त्यानंतर आमदार हेमंत रासने यांचा कसबा पोटनिवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन, अशा शुभेच्छा देणारा मजकूर फ्लेक्सवर लिहिण्यात आला आहे. श्रीराम भक्त प्रथमेश सतिश पाठक यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. ते भाजपच्या पुणे शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. या बॅनर्सवर पाठक यांचाही फोटो आहे. लावलेल्या या फ्लेक्समुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या फ्लेक्सबाजीवर सुषमा अंधारे यांनी विरोधकांना चांगलच धारेवर धरलं आहे. निवडणूक आयोगाने कानात येऊन सांगितलं की काय? सकाळी सकाळी रासने जिंकण्याची ही फ्लेक्सबाजी निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आणणारी नाही का…? या फ्लेक्सबाजीचा अर्थ काय काढायचा, हे तथाकथित महाशक्तीच्या मनसबदाऱ्यांनी कृपया आम्हाला समजावून सांगावे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.