खेडचे भूमीअभिलेखचे उपअधीक्षक ज्ञानेश्वर शिंदेंचे निलंबन
पुणे जिल्ह्यातील खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या निलंबनापाठोपाठ आता खेडचे भूमि अभिलेख विभागाचे उप अधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांचे निलंबन करण्यात आले आहे. एकाच महिन्यात खेड तालुक्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची तिसरी वेळ आहे.
या निलंबनाचे आदेश जमाबंदी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी जारी केले आहेत. सातत्याने गैरहजर राहणे, निकाली समजवर स्वाक्षरी न करणे, अनुदान खर्च न करता नव्याने अनुदान मिळण्याचा प्रस्ताव पाठविणे, आलेल्या तक्रारींवर कार्यवाही न करणे, पीएमआरडीएकडे बिनशेती मोजणी संदर्भातील अहवाल न पाठविणे, तसेच शिंदे यांची विभागीय चौकशी सुरु केली असता, त्यांनी त्याबाबतचे निवेदन कार्यालयात सादर केले नाही, या सर्व कारणास्तव शिंदे यांचे जमाबंदी आयुक्तांनी निलंबन केले आहे.
शिंदे हे फेब्रुवारी २०२४ पासून अद्याप पर्यंत वैद्यकीय कारणास्तव गैरहजर आहेत. तसेच यापूर्वी देखील वैद्यकीय कारणास्तव बऱ्याच कालावधीसाठी गैरहजर आहेत. त्यामुळे खेड येथील मोजणी कार्यालयातील कामाचा खोळंबा होत आहे.
सामान्य नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. यावरुन शिंदे यांना शासकीय नोकरीत स्वारस्य नसल्याने व कार्यालयीन कामकाजात गैरकृत्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या विभागीय चौकशीमुळे शिंदे यांना निलंबित करणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.