क्रीडा

यजमान ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानवर ४ धावांनी निसटता विजय

ॲडलेड : टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३८ वा सामना आज अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ४ धावांनी अफगाणिस्तानवर विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला १६९ धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ १६४ धावाच करु शकला. त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.

ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची देखील सुरुवात खराब झाली. १३.४ षटकांत अफगाणिस्तानचा निम्मा संघ तंबूत परतला. अफगाणिस्तान संघाकडून राशिद खानने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २३ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारच्या मदतीने नाबाद ४८ धावांची खेळी केली. तरी सुद्धा त्याला अफगाणिस्तान संघाचा पराभव टाळता आला नाही. गुलबदिन नायबने त्याला योग्य साथ देताना ३९ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना जोश हेझलवूड आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर केन रिचर्डसनने १ विकेट्स घेतली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाला पहिला धक्का २२ धावसंख्येवर बसला. कॅमेरून ग्रीन पहिल्या विकेटच्या रुपाने बाद झाला. त्यामुळे संघाची सुरुवात खराब झाली.

त्यानंतर स्टीव्हन स्मिथ देखील फक्त ४ धावा काढून बाद झाला. परंतु मिचेल मार्शने ४५ धावांची खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेलने संघासाठी सर्वाधिक धावांची खेळी खेळली. मॅक्सवेलने ३२ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला ८ बाद १६८ धावा करता आल्या. अफगाणिस्तान संघाकडून गोलंदाजी करताना नवीन-उल-हकने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकात २१ धावा दिल्या. फजल हक फारुकीने ४ षटकात २९ धावा देत २ विकेट्स घेत त्याला साथ दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये