
पुण्याच्या पश्चिमेकडून दक्षिणेकडे म्हणजेच पर्वतीपासून पर्वतरांगाची सुरुवात होते. याच डोंगररांगांमध्ये तळजाईचे पठार आहे. पठारावर गेल्या काही वर्षांत वन विभागाने हिरवाई केली आहे. रोज काही हजार लोक या पठारावर फिरायला, व्यायामासाठी येतात. वन विभागाच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडे एक तळे आहे, त्याजवळच तळजाईचे देवस्थान आहे. तळजाई देवीचे मंदिर ऐतिहासिक असून, याला चारशे वर्षांचा इतिहास आहे. १६७२ दरम्यान महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेकाची धामधूम होती. सभारंभ रायगडावर होता आणि आराध्य देवतांचा आशीर्वाद राजांना हवा होता. तुळजापूरहून, देवीचे प्रस्थान ठेवले आणि ही पालखी पुणे मार्गे पुढे रायगडाला जाणार होती. जिजाऊ मातेच्या दर्शनासाठी काही काळ पालखी जेथे ठेवली गेली तो हाच तळजाईचा पठार. साक्षात महाराष्ट्राच्या कुदैवतेचे अधिष्ठान आणि जिजाऊंचा पदस्पर्श या परिसरास लाभला आहे.
तळाजाई मंदिराबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. पूर्वी रावबहाद्दूर ठुबे यांचे या परिसरात वास्तव्य होते. ते देवीचे परमभक्त होते. त्यांना देवीने दृष्टान्त दिला. मला स्थानापन्न करण्यासाठी जे आसन तयार करशील ते सूर्योदयापूर्वीच तयार झाले पाहिजे, नाही तर मी जमिनीवर ठाण मांडीन, असे देवीने सांगितले. त्यानुसार ठुबे यांनी शोध घेतला आणि त्यांना तांदळाच्या स्वरूपातील पद्मावती, तळजाई माता, तुळजाभवानी यांच्या मूर्ती मिळाल्या. तळजाई पठारावरील तळ्यात या मूर्ती मिळाल्या म्हणून देवीला तळजाई असे नाव पडले. मातेने आसन वेळेत न झाल्याने तिने जमिनीवरच ठाण मांडले. मंदिरात तीन देवींच्या मूर्ती होत्या. त्या स्वयंभू रूपातील देवींच्या मूर्ती असल्याची माहिती मिळाली. देवींची नावे पद्मावती, तळजाई व तुळजाभवानी. मंदिराच्या पुढील बाजूस मारुतीचे मंदिर आहे. मागेही तीन छोटी मंदिरे आहेत.
रावबहाद्दूरांच्या निधनानंतर हा परिसर पुन्हा एकदा उजाड झाला होता. पण देवीभक्त अप्पासाहेब थोरात त्यांच्या सेवेतूनच या परिसराचा विकास सुरू झाला. त्यांनी मंदिराचा गाभारा आणि मंडप बांधला. प्रवेशद्वाराशी पडवी, मारुती मंदिर आणि तळजाई, पद्मावती, तुळजाभवानी यांचे घुमटाकार मंदिर बांधले. नवरात्रामध्ये मंदिरामध्ये उत्सव असतो. शहरातील, अगदी जिल्ह्यातीलही भजनी मंडळे मंदिरात सेवा रुजू करण्यासाठी येतात. देवीला तोरण बांधण्यासाठी अनेक मंडळांचे कार्यकर्ते वाजत-गाजत येतात. अष्टमीच्या दिवशी होमहवन आदींचे आयोजनाबरोबर रात्री नयनरम्य फटाक्यांची रोषणाई करण्यात येते.
–सुशील दुधाने