भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ९ वाजता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली. भारतीय संघासाठी पहिला क्वार्टर काही खास राहिला नाही. प्रतिस्पर्धी न्यूझीलंडने 0-१ ने आघाडी घेत पकड मजबूत केली होती. पण, मग भारतीय खेळाडूनी हार न मानता जोरदार पुनरागमन करत न्यूझीलंडच्या खेळाडूंवर दबाव टाकला. याचाच फायदा टीम इंडियाला पहिला गोल करताना झाला. टीम इंडियाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये शानदार कामगिरी करत एक गोल केला. मंदीप सिंगने केलेल्या गोलमुळे हाफ टाइमपर्यंत सामना १ -१ असा बरोबरीत राहिला.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच अर्थात तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने एक गोल करून २-१ अशी आघाडी घेतली. सलग चार पेनल्टी कॉर्नरमध्ये भारताने बचाव केल्याने न्यूझीलंडवरचा दबाब वाढतच राहिला. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत न्यूझीलंडचे खेळाडू संघर्ष करत राहिले पण त्यांना गोल करता आला नाही. अनेकदा न्यूझीलंडचे खेळाडू गोल करण्यासाठी एकवटले पण त्यांच्यासमोर भारतीय गोलरक्षक काळ बनून उभा राहिला. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत भारताने आपली आघाडी कायम ठेवली होती.
चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला न्यूझीलंडने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्वार्टरच्या दुसऱ्याच मिनिटाला भारताने मारा केला असता न्यूझीलंडच्या गोलरक्षकाने चांगली कामगिरी केली. खेळ संथ गतीने सुरू असताना न्यूझीलंडच्या सायमन चाइल्डने (आंतरराष्ट्रीय १४७ वा गोल) आठव्या मिनिटाला महत्त्वाचा गोल करून २-२ अशी बरोबरी साधली. विशेष बाब म्हणजे सामन्यातील अखेरची दोन मिनिटे शिल्लक असताना भारताकडून हरमनप्रीत सिंगने मॅचविनिंग गोल करून ३-२ अशी आघाडी घेतली. एकूणच टीम इंडियाने न्यूझीलंडच्या तोंडचा घास पळवला आणि विजय साकारला. भारताने ३-२ अशा फरकाने सामना आपल्या नावावर केला.