सुषमा अंधारेंना नडला अन् थेट पक्षाशीच भिडला; अप्पासाहेब जाधवांची पक्षातून हकालपट्टी

बीड | बीडमधील महाप्रबोधन यात्रा काही तासांवर आली असतानाच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) आणि उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली होती. आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे या पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप केला होता. एवढेच नव्हे तर आपल्यात भांडण झाले तेव्हा मी सुषमा अंधारे यांना दोन कानशिलात ठेवून दिल्याचा दावाही आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. मात्र हा दावा करणारे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आली आहे, तर सुषमा अंधारे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ही शिंदे गटाने लिहिलेली स्क्रिप्ट असल्याचं म्हटले आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून आला आदेश…
बीड जिल्ह्यातील या प्रकरणानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून एक आदेश काढण्यात आला आहे. ज्यात बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील आणि जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आली आहे.
सुषमा अंधारेंचे स्पष्टीकरण
आप्पासाहेब जाधव यांच्या आरोपांनंतर सुषमा अंधारे यांनी फेसबुक लाईव्हमधून प्रतिक्रिया दिली आहे. बीड शहरात 20 मे रोजी होणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रेच्या ठिकाणी आपण पाहणीसाठी गेलो होतो. यावेळी सभेच्या स्टेजची पाहणी करताना ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरून शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर जाधव तेथून निघून गेले. मात्र जाधव यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून, यात्रेला गालबोट लागावं म्हणून शिंदे गटाने ही स्क्रिप्ट रचल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.