मुंबई : (Thackeray Group New party name and symbol) निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून तीन निवडणूक चिन्ह आणि पक्षासाठी तीन नावे निश्चित करण्यात आली आहेत. ही नावे आणि निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे गटातील नेत्यांकडून माध्यमांना देण्यात आली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याकडून, शिवेसना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही नवीन नावे सुचवण्यात आली आहेत. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षासाठी सुचवलेल्या नावात ठाकरे कुटुंबातील तीन पिढ्यांचे प्रतिबिंब दिसून येत आहे.
तर, चिन्ह निवडीमध्ये त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत लवकरच निर्णय घ्यावा अशी विनंती शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह पोहचवण्याचे आव्हान ठाकरे गटासमोर असणार आहे.