पुण्यात रंगणार दीर्घांकचा ७५ वा प्रयोग

श्री. देवधर यांनी गतवर्षी दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासून या दीर्घांकास सुरुवात केली आणि राष्ट्राच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ प्रयोग करायचे ध्येय ठेवले. आतापर्यंत पुणे, मुंबई रत्नागिरी, साखरपा, दापोली, मालवण, कुडाळ, गोवा, चिपळूण, खेड (रत्नागिरी), हातखंबा, कणकवली इत्यादी भागांमध्ये अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. सर्वच ठिकाणी या प्रयोगांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

पुणे : दीडशे वर्षांच्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी लाखो लोकांनी संसाराचा त्याग केला. अगणित हालअपेष्टा सहन केली. हजारो लोकांनी प्राणार्पण केले. असे असूनही हल्लीच्या अनेक युवकांकडून आमच्यासाठी देशाने काय केले, असे ऐकायला येते.

भारतामध्ये जन्म झालेले, परंतु उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणारे तेथे कायमस्वरूपी वास्तव्य करणाऱ्या अनेक युवकांना स्वातंत्र्यलढ्याचे गांभीर्य फारसे नाही. त्यांनी स्वातंत्र्याचा लढा प्रत्यक्ष बघितलेला नाही.‌ अशा युवकांमध्ये स्वातंत्र्यलढ्याविषयी सखोल माहिती देण्यासाठी ‘मी भारतीय’ दीर्घांकाची निर्मिती झाली, असे या दिग्दर्शक व मुख्य सूत्रधार रवींद्र देवधर यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या सर्वच कानाकोपऱ्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये हा प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी “मी भारतीय” ह्या दीर्घांकचा ७५ वा प्रयोग महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, दीप बंगला चौक, भारतीय विद्या भवन रंगमंचावर सायंकाळी ६ वाजता आयोजिण्यात आला आहे.

या प्रयोगालाही प्रवेशमूल्य ऐच्छिक आहे. श्री. देवधर यांना नोकरी करताना दीर्घांकाची कल्पना सुचली. केवळ दोनच पात्र असलेल्या या दीर्घांकात स्वातंत्र्याच्या इतिहासापलीकडे जाऊन देण्यात आलेल्या माहितीची व्याप्ती खूप मोठी आहे.

Prakash Harale: