“कोरोना काळातला मोठा घोटाळा सोमवारी जाहीर करणार”, संदीप देशपांडेंचा खळबळजनक दावा
!["कोरोना काळातला मोठा घोटाळा सोमवारी जाहीर करणार", संदीप देशपांडेंचा खळबळजनक दावा sandeep deshpande](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/01/sandeep-deshpande-780x470.jpg)
मुंबई | Sandeep Deshpande – सध्या मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. तसंच ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्व पक्ष जोमानं तयारीला लागले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. अशातच मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक दावा केला आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, मी कार्यालयात नसताना एक व्यक्ती कागदपत्र आणि पेन ड्राईव्ह (Pen Drive) ठेवून गेली होती. ती व्यक्ती कोणा होती हे समजू शकलं नाही. पण, या पेन ड्राईव्हमध्ये कोरोना (Corona) काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे आहेत. हे सगळं मी सोमवारी जाहीर करणार आहे. तसंच मुंबईकरांची लूट कोणी आणि कशी केली याची माहिती आणि बँक खात्यांचे पुरावेही दाखवणार असल्याचं देशपांडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबई पालिकेतील व्यवहारावर भाजपनंही (BJP) आक्षेप घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी करोना काळात ठाकरे गटातील नेत्यांनी मोठे आर्थिक घोटाळे केले असल्याचा आरोप केलेला आहे. अशातच आता संदीप देशपांडे 23 जानेवारी रोजी नेमका कोणता घोटाळा समोर आणणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.