राष्ट्रसंचार कनेक्ट

धरणे भरली, चिंता मिटली

यंदाच्या पावसाने सरासरी ओलांडली

रांजणी : यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांच्या दृष्टीने समाधानकारक राहिला. यावर्षी पावसाळा सुरू होऊन सुमारे साडेतीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. दरम्यान, जून महिन्यात कमी पाऊस झाला असला तरी उर्वरित अडीच महिन्यांत जिल्ह्यात धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सव्वीस धरणांपैकी २० धरणे काठोकाठ भरली आहेत. अन्य पाच धरणांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे. सध्या केवळ माणिकडोह हे एकच धरण अद्याप चौदा टक्के रिकामे राहिले आहे.

जिल्ह्यातील खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे यंदा १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये मिळून रविवारी आठ वाजेपर्यंत २०१.०२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. एकूण पाणीसाठ्याचे हे प्रमाण १०० टक्के इतके आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या धरणसाठा आकडेवारी अहवालातून ही बाब उघड झाली आहे.

नारायणगाव पाटबंधारे विभाग कुकडी प्रकल्प कडा क्रमांक – १ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर म्हणाले, की गेल्या वर्षी जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण १७८.५८ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक राहिला होता. गतवर्षीच्या या पाण्यासाठीचे प्रमाण हे ९०.३ इतके होते. गेल्या वर्षीच्या आजअखेरपर्यंतच्या एकूण पाणीसाठ्यात यंदा २२.४३ टीएमसीने वाढ झाली आहे. यंदा एकूण पाणीसाठ्याच्या प्रमाणात सुमारे ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा-आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा-देवघर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. या सर्व धरणांतील मिळून एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठाक्षमता ही १९८.३४ टीएमसीइतकी आहे. प्रत्यक्षात या धरणांमध्ये आजअखेर २०१.०१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणाच्या भिंतीची उंची फ्लॅगच्या माध्यमातून वाढवण्यात आली असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे यंदा उजनी धरणातील एकूण उपयुक्त पाणीसाठ्याच्या क्षमतेत ६.६८० टीएमसीने वाढ झाली आहे. दरम्यान, शंभर टक्के भरलेल्या धरणांमध्ये टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा-आसखेड, आंध्रा, वडिवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरादेवघर, वीर, डिंभे, विसापूर आणि उजनी या धरणांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये