मुलीनेच शरद पवार नास्तिक असल्याचं सांगितलं; राज ठाकरेंच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई : सध्या राज्यात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत असून जातीयवादाचं राजकारण केल्याचा आरोप करत आहेत. तसंच राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून उत्तरं दिली जात असताना सुप्रिया सुळे यांनीही यावर भाष्य केलं आहे. त्या ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
सुप्रिया सुळेंना शरद पवारांवरील टीकेसंबंधी विचारण्यता आलं असता त्या म्हणाल्या, “दगडं आंब्याच्या झाडावर मारली जातात. बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारतं का? त्यामुळे लोकं उठसुट शरद पवारांवर जातीचे आरोप करतात”.
राज ठाकरेंनी ४ मे चा अल्टिमेटम दिला असून या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. यावर मनसेच्या नेत्यांनी आक्षेप घेतला असल्यासंबंधी विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “या देशात कोर्ट आहे. ज्यांना वाटतंय की त्यांच्यावर अन्याय झालाय त्यांनी कोर्टात जावं”.